आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:पावबाकी व सुकेवाडीत तीन ठिकाणी सशस्त्र दरोडे

संगमनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेजारील सर्व घराच्या कड्या लावून ६ सशस्त्र दरोडेखोरांनी ३ घरावर सिनेस्टाईलने दरोडे टाकले. महिलांना चाकूचा धाक दाखवुन व मारहाण करून अंगावरील दागिने ओरबाडले. घरातील कपाट फोडून ४ लाख ८५ हजाराचे सोन्याचे दागिने, ४३ हजाराची रोकड व ३ मोबाईल असा साडेपाच लाखाचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी मध्यरात्री शहरालगत असलेल्या पावबाकी व सुकेवाडी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरोड्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. मात्र, पोलिस येण्याच्या अगोदर दरोडेखोर पसार झाले. पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. नाशिक येथील श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना प्राचारण करण्यात आले. सहा दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असले तरी तपासाकामी पोलिसांपुढे आव्हान राहणार आहे.

चाकू, लोखंडी टामी व पाईप हातात घेऊन दरोडेखोरांनी प्रथम सुनील शिवाजी नाईकवाडी (वय ४५, पावबाकी) यांच्या घरावर दरोडा टाकत १ लाख २२ हजाराचे दागिने, ३० हजाराची रोकड व मोबाईल घेऊन पसार झाले. पावाबकी येथील डोंगरे मळा येथे राहणाऱ्या रेश्मा नीती दातीर (वय ३०) यांच्या घरावर जात वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. घरातील सामानाची नासधूस केली. कपाट फोडून ५३ हजाराचे सोन्याचे दागिने, १३ हजाराची रोकड व मोबाईल घेऊन पोबारा केला.

नंतर त्यांनी जवळच असलेल्या सुकेवाडीकडे मोर्चा वळवला. उपसरपंच सुभाष कुटे यांच्या वस्तीवर जात आसपासच्या घरांना बाहेरून कड्या लावून घेतल्या. उत्तम सखाराम कुटे (वय ५९) यांच्या घरात प्रवेश करत ६० हजाराचे सोन्याचे दागिने, १ लाख २५ हजाराची रोकड व मोबाईल घेऊन पसार झाले. सुनील शिवाजी नाईकवाडी यांच्या फिर्यादीवरून ६ दरोडेखोरांवर शहर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बारकू जाणे तपास करीत आहे.

पशुधनही नाही सुरक्षित
गोठ्याचे कुलूप तोडुन बांधून ठेवलेल्या १२ शेळ्या व २ बोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. ही घटना शनिवारी मध्यरात्री गुंजाळवाडी पठार येथे घडली. एकूण २ लाख १० हजारांचा एेवज चाेरीला गेला. सदाशिव विठ्ठल भोर (वय ४२, गुंजाळवाडी पठार) यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास सहायक फौजदार ए. आर. गांधले करीत आहेत. धान्य व शेती साहित्य चोरीनंतर आता चोरट्यांनी पशुधनावर लक्ष केंद्रित केल्याने त्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...