आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांची लूट:पारनेरमध्ये युरिया खताची कृत्रिम टंचाई, जादा दराने होतेय विक्री

अहमदनगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेले काही दिवस समाधानकारक पाऊस होत असल्याने खरीप हंगामातील पिके बहारात आली आहेत. त्यामुळे रासायनिक खतांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर खतांची विशेषतः युरिया खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शहरातील खत विक्रेते जादा दराने युरिया खताची विक्री करीत आहेत. युरिया खताच्या एका गोणीसोबत पूरक खते घेण्याची सक्ती विक्रेत्यांकडून केली जात आहे. खत विक्रेत्यांकडून होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

बफर स्टॉक उपलब्ध करून दिला

कृषी विभागाने खरीप हंगामातील खतांची वाढती मागणी लक्षात घेऊन युरियाचा बफर स्टॉक उपलब्ध करून दिला. तालुक्यातील इतर गावांमध्ये कृषी विभागाच्या बफर स्टॉकमधील युरिया खत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र पारनेर शहरातील १४ खत विक्रेत्यांपैकी एकाही विक्रेत्याने बफर स्टॉकमधील युरिया खरेदी केला नाही. त्यातूनच शहरात कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. दरम्यान, शहरातील विक्रेत्यांनी दोन दिवसात बफर स्टॉकमधील युरिया खरेदी करावा व मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून देण्याचे विक्रेत्यांना कळवण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड यांनी सांगितले.

खतखरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड

मोसमी पावसाने साथ दिल्याने खरीप हंगामातील मूग, बाजरी, सोयाबिन, मका, वाटाणा तसेच चार पिके जोमात आहेत. गेल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी किटकनाशकांची फवारणी, खुरपणी आदी कामे उरकून घेतली आहेत. त्यानंतर दोन दिवस चांगला पाऊस झाल्याने पिकांना खते देण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. खतांची मात्रा वेळेत दिली तरच खते लागू होऊन अपेक्षित परिणाम साधला जाऊन उत्पन्नात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांची खते खरेदी करण्यासाठी झुंबड उडत आहे. खतांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने, या परिस्थीतीचा गैरफायदा घेत विक्रेत्यांनी खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून खतांचा काळाबाजार सुरू केला.

अन्यथा आंदाेलन

कृत्रिम टंचाई निर्माण करून खतांची काळा बाजारात विक्री करणे, शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणे खत विक्रेत्यांनी थांबवावे. युरिया खताबरोबर पूरक खते घेण्याची सक्ती करू नये. कृषी विभागाने युरीयाचा बफर स्टॉक उपलब्ध करून देऊन खतांच्या काळ्या बाजाराला आळा घालावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ज्येष्ठ नेते बाळासाहेब पठारे यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...