आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:सक्षम राजकीय वारसदार म्हणून पाचपुते प्रतापसिंह यांना काष्टी गटातून उतरवणार

अंकुश शिंदे | श्रीगोंदे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांनी बाजी मारली. पण आमदार झाल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आपला जनसंपर्क मर्यादित करावा लागला. आता हळूहळू ते बाहेर पडत असले तरी आता त्यांच्याकडून सक्षम राजकीय वारसदार पुढे केला जाईल, अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यासाठीच आमागी जिल्हा परिषद निवडणुकीत पुत्र प्रतापसिंह यांना काष्टी गटातून रिंगणात उतरवण्याचा आमदार पाचपुते यांनी निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे.

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ पुत्र विक्रमसिंह यांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्षपद मिळाले. पण त्या पदाची विरोधकांनी खिल्ली उडवली. अर्थात तरीही विक्रमसिंह अजून राजकारणात सक्रिय होण्याचे मनावर घेताना दिसेनात. दुसरीकडे पाचपुते यांचे पुतणे साजन मात्र जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बाशिंग बांधून बसले असल्याची चर्चा आहे. पण पाचपुते यांच्या तालुक्यातील निष्ठावंत चौकडीचा साजन यांच्या नावाला अंतर्गत विरोध आहे.

साजन यांचा पर्याय आमदार पाचपुते यांच्या कुटुंबातही काहींना मान्य नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत साजन यांना उमेदवारी करायची झाल्यास त्यांना उमेदवारी देताना आमदार पाचपुते यांची तारेवरची कसरत होणार आहे. त्यामुळे पुत्र प्रतापसिंह यांना काष्टी गटातून रिंगणात उतरवण्याचा आमदार पाचपुते यांनी निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे.

दुसरीकडे आपण आमदार पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे साजन यांनी मध्यंतरी सांगितले असले तरी आपल्यावर अन्याय होत असल्यास आपण आपला निर्णय घेण्यास सक्षम असल्याचेही सूतोवाच केले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आता काय होते ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

प्रतापसिंह यांच्या शिष्टमंडळाने घेतली पाचपुतेंची भेट
आपण आपले पुत्र प्रताप यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यावी, त्यांना निवडून आणण्यासाठी आपण जीवाचे रान करू, असे मत प्रकट करणारे काही निवडक कार्यकर्ते आमदार पाचपुते यांना २ दिवसांपूर्वी भेटले. या कामी सर्वांशी बोलून योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असे आमदार पाचपुते यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...