आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:नगरकरांचे तब्बल दोन कोटी खड्ड्यात

मयूर मेहता | नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरातील रस्त्यांची दुरावस्था व सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांमुळे नगरकर त्रस्त झाले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून शहरातील अनेक रस्त्यांची कामे निधी उपलब्ध असतानाही प्रशासकीय अडथळे व अडचणींमुळे ठप्प आहेत. त्यामुळे महापालिकेकडून तात्पुरती उपाययोजना म्हणून सातत्याने या रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. या दुरुस्तीवर मागील चार वर्षात तब्बल दोन कोटी रुपयांच्या निविदा महापालिकेकडून काढण्यात आल्या आहेत. त्यानंतरही शहरातील खड्ड्यांची समस्या कायम असल्याने नगरकरांचे तब्बल दोन कोटी रुपये खड्ड्यातच गेल्याचे चित्र आहे.

महापालिकेमार्फत गेल्या तीन ते चार वर्षांपासून शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. या योजनेच्या कामामुळे रस्त्यांची कामे रखडल्याचे कारण पुढे करत महापालिकेकडून सातत्याने खड्डे बुजवून तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. या तात्पुरत्या मलमपट्टीसाठी सन २०१८-२०१९ पासून २०२१-२०२२ या चार वर्षात तब्बल १.९८ कोटी रुपयांच्या निविदा काढून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. त्यातून कामे करण्यात आली आहेत. गणेशोत्सव व मोहरम उत्सवापूर्वीही शहरात खड्डे बुजवण्यात आले.

रस्त्यांच्या या वारंवार केल्या जाणाऱ्या दुरूस्तीवर तब्बल दोन कोटी रुपये खर्चूनही खड्डे मात्र कायमच आहेत. सध्या महापालिकेकडून पावसाळ्यामुळे थांबलेली तब्बल १४१ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातून शहराच्या बहुतांश भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. असे असतानाही मनपाने खड्डे बुजविण्यासाठी पुन्हा १ कोटींचा खर्च प्रस्तावित केला असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

निकृष्ट कामे करूनही कोणावर कारवाई नाही
मागील काही काळात शहरात नव्याने करण्यात आलेल्या रस्त्यांची पुन्हा दुरावस्था झाली आहे. टेलिखुंट ते मंगलगेट, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जुनी महापालिका ते होशिंग हॉस्पिटल ते तख्ती दरवाजाकडे जाणारा रस्ता या रस्त्यांची कामे काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली आहेत. यातील काही ठिकाणी पुन्हा रस्ता खराब झाला आहे. निकृष्ट कामे करूनही ठेकेदारांवर मात्र कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.

ठराविक रस्त्यांवर होतेय वारंवार पॅचिंग!
नगर शहर व उपनगर परिसरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वर्षानुवर्षे केवळ पॅचिंगचेच काम केले जात आहे. पत्रकार चौक ते भिंगारवाला चौक, अप्पू चौक ते दिल्लीगेट, चितळे रोड, नवीपेठ, माळीवाडा, लक्ष्मी कारंजा, जुने न्यायालय परिसर, आडते बाजार अशा अनेक रस्त्यांवर गेल्या काही वर्षात लाखो रुपये खड्डे बुजवण्यावर खर्च करण्यात आले आहे. ठराविक रस्त्यांवर वारंवार खर्च होत असतानाही या रस्त्यांची कामे करण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

बातम्या आणखी आहेत...