आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेने शहरातील मोकाट जनावरांना पकडण्यासाठी वर्षभरापूर्वी खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. मात्र, आजही शहरात हा प्रश्न कायम आहे. असे असताना एका मोकाट जनावराला पकडण्यासाठी मनपाने मागील सहा महिन्यात सरासरी १२ हजार ४४४ रुपयांचा खर्च केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खासगी संस्थेने १८३ दिवसात ४२५ जनावरे पकडली. त्यातील फक्त २७० जनावरे पकडून ती कोंडवाड्यापर्यंत पोहचल्याचे उघड झाले आहे.
पिपल फॉर ॲनिमल या संस्थेला मोकाट जनावरे पकडण्याचे काम मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात देण्यात आले होते. त्यापोटी दरमहा ५ लाख ६० हजार रुपये संस्थेला मंजूर करण्यात आले आहेत. शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. पोलिस प्रशासनानेही याबाबत अनेकवेळा मनपा प्रशासनाला पत्र देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.
मात्र, संस्थेकडून महिनाभरात अवघी ५० ते ६० जनावरे पकडून कारवाई केली जात आहे. बहुतांशी जनावरे कारवाई न करताच सोडून देण्यात येत आहेत. मागील सहा महिन्यात या कामावर ३३ लाख ६० हजार रुपये महापालिकेने खर्च केला आहे. दरम्यान, वर्षभरातील कामापोटी सहा महिन्याची देयके अदा झाली असून उर्वरित सहा महिन्याची देयके प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.
पकडलेली १५५ जनावरे संस्थेने सोडून दिली
खासगी संस्थेने जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पकडलेल्या जनावरांपैकी १५५ जनावरे कारवाई न करताच सोडून दिली आहेत. तर फक्त ५३ जनावरांबाबत दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे कोंडवाडा विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोंडवाड्यातील १०९ जनावरांचे पुढे काय झाले, हाही संशोधनाचा विषय आहे.
४ महिन्यात फक्त १०९ कोंडवाड्यात
महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने खासगी संस्थेकडून जून ते सप्टेंबर या चार महिन्यात करण्यात आलेल्या कामाचा वस्तुस्थिती दर्शवणारा अहवाल मनपा आयुक्तांना सादर केला आहे. त्यानुसार संस्थेने पकडलेली फक्त १०९ जनावरे कोंडवाड्यात आढळून आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.