आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठरल्याप्रमाणे गुरुवारी (ता. ३) झालेल्या निवडणुकीच्या सभेत महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे (ठाकरे गट) नगरसेवक गणेश कवडे यांची बिनविरोध निवड झाली. नंतर ठरल्यानुसारच महापौर रोहिणी शेंडगे यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक विनित पाऊलबुधे यांना नवे सभागृहनेता म्हणून नियुक्तीचे पत्र दिले. दरम्यान, सभापती झाल्यावर कवडे यांनी लगेच पदभार स्वीकारला. स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी कवडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. समितीच्या १६ सदस्यांमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी ५ सदस्य असल्याने व त्यांचेच १० जणांचे बहुमत असल्याने चार सदस्य असलेल्या भाजपने विरोधात उमेदवारही दिला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली सभेत कवडे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा झाली. या वेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे, नगर सचिव एस. बी. तडवी उपस्थित होते.
निवडीनंतर जिल्हाधिकारी सालीमठ यांनी नूतन सभापती कवडेंचा सत्कार केला. या निवडीनंतर कवडे यांनी पदभार स्वीकारला. मनपाच्या आवारात ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत कवडे समर्थकांनी जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. त्यानंतर ठरल्यानुसारच महापौर शेंडगे यांनी सभागृह नेतेपदी नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादीचे नगरसेवक विनित पाऊलबुधे यांना दिले. यावेळी उपमहापौर उपमहापौर गणेश भोसले, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख संभाजी कदम, संजय शेंडगे, नजू पैलवान, सचिन शिंदे, शाम नळकांडे, प्रकाश भागानगरे, सुनील त्रिंबके, प्रदीप परदेशी, संग्राम कोतकर, मंगल लोखंडे, स्मिता अष्टेकर, आशा निंबाळकर, प्रशांत गायकवाड, पल्लवी जाधव, अविनाश घुले, अनिल बोरुडे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होेते. सभापती कवडे यांनी मनपात सभागृहनेता म्हणूनही यापूर्वी काम केले आहे.
विकासाचे वर्ष म्हणून साजरे करणार : कवडे
यंदाचे मनपाचे निवडणूक वर्ष असल्याने ते सर्वांना सोबत घेऊन विकासाचे वर्ष म्हणून साजरे करण्याचा मानस सभापती कवडे यांनी व्यक्त केला. शहराचा विकास करताना आम्ही समितीतील सर्वपक्षीय सदस्य कोणताही किंतू-परंतु न बाळगता एकदिलाने प्रयत्न करू. माजी आमदार (स्व.) अनिलभैय्या राठोड व मामा (स्व.) सुरेश शेळके यांच्या आशीर्वादाने व महापौर रोहिणी शेंडगे, आ. संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप व काँग्रेसच्या सहकार्यानेच सभापती झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरवासियांना पूर्ण दाबाने व पुरेसे पाणी या मार्च महिन्याखेरीपर्यंत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे कवडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.