आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्पाला घर-घर:लाभार्थ्यांचा प्रतिसादच मिळत नसल्याने महापालिकने घरकूल योजना गुंडाळली

मयूर मेहता | नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नगर शहरात मंजूर असलेल्या घरकूल प्रकल्पांपैकी संजयनगर वगळता इतर प्रकल्प महापालिकेने गुंडाळले आहेत. केडगाव व नालेगाव येथील ८४० घरकुलांसाठी काढण्यात आलेली निविदाही महापालिकेने वाढीव खर्चाच्या मागणीमुळे रद्द केली आहे. तर आगरकर मळा येथील ५९४ घरकुलांच्या प्रकल्पासाठी निविदला प्रतिसादच मिळालेला नाही. सदर योजनेची मुदत संपुष्टात येत असल्याने महापालिकेने या संदर्भातील अहवाल शासनाकडे सादर केला आहे. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवल्याने ही योजना शहरात फोल ठरली आहे.

आवास योजनेसाठी ११ हजार ३२३ लाभार्थी पात्र ठरले. सन २०१८ मध्ये केडगाव येथे ६२४ व नालेगाव येथे २१६ असा ८४० घरकुलांचा प्रकल्प मंजूर झाला. सन २०१९ मध्ये आगरकर मळा येथे ५९४ घरांचा आणखी एक प्रकल्प मंजूर झाला आहे. केडगाव व नालेगाव प्रकल्पासाठी ८४० लाभार्थी निश्‍चित करण्यात आले. सुमारे ६५ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून, त्याची निविदा प्रक्रियाही झाली होती. मात्र, या दोन्ही घरकुलांसाठी केवळ ४५ लाभार्थ्यांनीच अनामत रकमा भरल्या. त्यातील बहुतांशी लाभार्थ्यांनी अनामत रकमा परत नेल्या.

सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीय नागरिकांनी पाठ फिरविल्यामुळे हे दोन्ही प्रकल्प बारगळले. दरम्यानच्या काळात ठेकेदारानेही जादा दराची मागणी केली. मात्र, योजनेला प्रतिसादच मिळत नसल्याने महापालिकेने निविदा प्रक्रिया रद्द केली आहे. आगरकर मळा येथील घरकुल प्रकल्पासाठी वारंवार निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र, विकसाकांकडून त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही.

केंद्राच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही होईल
केंद्राच्या या योजनेची मुदतही संपुष्टात येत असल्याने महापालिकेने वस्तुस्थितीचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. लाभार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने केडगाव, नालेगाव व आगरकर मळा येथील घरकुल प्रकल्पांच्या उभारणीबाबत कार्यवाही थांबवण्यात आलेली आहे. केंद्र शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून, त्यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल. डॉ. पंकज जावळे, आयुक्त, महापालिका.

संजयनगर येथे पहिला टप्पा पूर्ण होणार
पंतप्रधान आवास योजनेतील झोपडपट्टी पुनवर्सन घटकांतर्गत शहरातील संजयनगर येथे २९८ घरांचा प्रकल्प महापालिकेने मंजूर केलेला आहे. तेथे २९८ पैकी ३३ घरकुलांचे काम पहिल्या टप्प्यात झाले आहे. त्याचे उद्घाटनही करण्यात आले आहे. उर्वरीत सदनिकांचे काम सुरू आहे. सद्यस्थितीत पंतप्रधान आवास योजनेतील संजयनगर येथील प्रकल्पाचे काम सुरू आहे.

मध्यमवर्गीयांनी का फिरविली पाठ?
योजनेत केवळ ३०० चौरस फुटांचेच घरकुल (सदनिका) मिळणार असल्याने मध्यमवर्गीयांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यातही घराची किंमत ९ ते १० लाख रुपये आहे. या किंमतीत केडगाव, बोल्हेगावसारख्या उपनगर परिसरात खाजगी व्यावसायिकांकडून घरकुले मिळत असल्याने या योजनेकडे मध्यवर्गीय पाठ फिरवत असल्याचे समोर आले आहे.

धोरणात्मक निर्णयाची गरज
मध्यमवर्गीयांना या प्रकल्पाकडे आकर्षित करण्यासाठी ३०० चौरस फुटांऐवजी किमान ५०० चौरस फुटांपर्यंत जागा असणे आवश्यक आहे. बहुतांशी लाभार्थी हातावर पोट भरणारे नागरिक आहेत. या नागरिकांसमोर १ लाखाची अनामत रक्कम भरायची कोठून असा प्रश्न आहे. त्यांना बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने शासनाने वित्तीय महामंडळामार्फत कर्ज उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...