आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध योजनांमुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ:जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांचे प्रतिपादन

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध योजनांमुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी मोठी मदत होत आहे. तरुण शेतकर्‍यांचा सहभाग वाढल्याने प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत मोठे काम झाले. अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांना यामुळे चालना मिळाली. काही योजना बँक अधिकार्‍यांना न समजल्याने त्या योजना कृषी अधिकार्‍यांनी त्यांना समजावून सांगितल्याने याचा शेतकर्‍यांना फायदा होऊन अर्थसाह्य मिळण्यास मदत होईल. कृतिसंगम कार्यशाळेप्रमाणे योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी केले.

कृतिसंगम कार्यशाळेचे आयोजन

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग, नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत कृतिसंगम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी आत्माचे कृषी उपसंचालक राजाराम गायकवाड, कृषी संचालक रवींद्र माने, राज्य समन्वयक (एआयएफ) मेघनाथ कांबळे (पुणे), उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे (नगर), विलास नलगे (श्रीरामपूर), सुधाकर बोराळे (संगमनेर), अनिल गवळी (कर्जत), सेंट्रल बँकेचे एलडीएम चंदनकुमार मंगलम, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, तंत्र अधिकारी किरण मोरे, कृषी अधिकारी शंकर किरवे, आत्माचे समन्वयक केदार फुलसौंदर, दहिगावने कृषी विज्ञान केंद्राचे श्यामसुंदर कौशिक, प्रवीण गोरे, प्रकाश आहेर, कौस्तुभ कराळे, नंदकुमार घोडके, उमेश डोईफोडे, श्रीकांत जावळे आदी उपस्थित होते.

यावेळी राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे यांनी कृषी पायाभूत योजनांची माहिती देताना सांगितले की, शेतीमालाला योग्य भाव मिळून त्यांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांना विविध योजनांद्वारे लाभ मिळवून द्यावा. योजनेंतर्गत राज्याकरिता 8460 कोटी रुपयांचा लक्ष्यांक निश्‍चित केल्याचे ते म्हणाले.

बाजारपेठ संपर्कवाढ व उपप्रकल्प यावर माहिती

‘आत्मा’चे उपसंचालक राजाराम गायकवाड यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग योजना, स्मार्ट योजना, वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, गट लाभार्थी, पायाभूत सुविधा पात्रता व निकष, प्रकल्पाचे प्रास्ताविक घटक, प्रकल्पातील शेतकरी सहभागाचे घटक, बाजारपेठ संपर्कवाढ व उपप्रकल्प यावर माहिती दिली.

यावेळी एलडीएम चंद्रकुमार मंगलम यांनीही मनोगत व्यक्त केले. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त कृषी पर्यवेक्षक संजय मेहत्रे लिखित ‘हर घर तिरंगा’ या कवितेचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ‘आत्मा’चे प्रवीण गोरे, प्रकाश आहेर, कौस्तुभ कराळे, नंदकुमार घोडके, उमेश डोईफोडे, श्रीकांत जावळे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय मेहत्रे यांनी केले. रवींद्र माने यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...