आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला कवडीमोल प्रतिकिलो १ रुपया भाव मिळाल्याचा धक्का सहन न झाल्याने भरत जाधव (३८, रा. गुजरवाडी, श्रीरामपूर) या कांदा उत्पादक शेतकऱ्याने बाजार समिती आवारात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सध्या श्रीरामपूर बाजार समितीत क्रमांक एक प्रतिच्या कांद्याला प्रत प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात रविवारी गुजरवाडी येथील शेतकरी भरत जाधव यांनी आपला कांदा उपबाजारात विक्रीसाठी आणला होता. मात्र, रविवार लिलावाचा आधिकृत दिवस नव्हता. टाकळीभान उपबाजारात मंगळवारी व शुक्रवारी कांद्याचे लिलाव होतात. असे असतानाही जाधव यांच्या आग्रहास्तव एका व्यापाऱ्याने कांदा घेण्यास संमती दर्शवली.
जाधव यांनी आणलेल्या एक कांदा गोणी फोडली असता तो माल “नो बीट’ झाला. त्याला प्रतिकिलो १ रुपया भाव देऊ केला होता. बाकीच्या आडतीवरील लिलाव मंगळवारी होणार होते. मात्र, एका आडतीवरील कांदा नो बीट झाल्याने हबकून जाऊन जाधव यांनी काही वेळाने विषारी औषध प्राशन केले. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने जाधव यांना साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असली तरी धोका टळायला अजून काही तास वाट बघावी लागेल, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. तर, आपल्या कांद्याला कमी भाव मिळाल्याचा धक्का सहन न झाल्याने भरत यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
कांद्यापेक्षा गोणीचा खर्चच जास्त
सध्या चांगल्या कांद्यालाही चांगला भाव मिळत नाही. कांदा चाळीत भरून उरलेला खराब अर्थात खाद किंवा जोडकांदा शेतकरी काहीतरी पैसे मिळतील, या अपेक्षेने विक्रीसाठी आणतात. त्यासाठी अठरा ते वीस रुपयांची गोणी लागते. वाहतूक खर्च, मजुरी वेगळीच. त्याला एक रुपये ते दोन रुपये, असा कवडीमोल भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी खचून जातात.
प्रत चांगली नसल्याने कमी भाव
या शेतकऱ्याने खाद किंवा जोडसदृश कांदा विक्रीसाठी आणला होता. मात्र, रविवारी लिलावाचा दिवस नसतो. त्यामुळे व्यापारी नसतात. मात्र, आपल्याला पैशांची गरज आहे म्हणत शेतकऱ्याने विक्रीचा आग्रह धरला. त्यावर व्यापाऱ्याने तयारी दर्शवत भाव सांगितला. मात्र, प्रत चांगली नसल्याने कमी भाव सांगितला. त्यावर त्यांनी हे कृत्य केले. ज्या दिवशी कांदा लिलाव असतो, त्याच दिवशी व चांगल्या प्रतीचा कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणावा.
-किशोर काळे, मुख्य व्यवस्थापक, कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीरामपूर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.