आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआदर्शांना हरताळ फासून हल्ली दुष्कृत्यांना बळ मिळत आहे. या प्रवृत्ती संपवण्यासाठी हिंदुत्व समजून घेत रामाच्या वृत्तींचा जागर मनामनांत जागवावा. संताच्या मार्गदर्शनानुसार झोपलेल्या समाजाला जागृत करून समाजाचा हरवलेला राष्ट्राभिमान गवसणी देण्याचे काम म्हणजे हिंदुत्व आहे. भारतात हिंदू धर्म व हिंदुत्ववास काही दुष्ट शक्तींकडून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे प्रयत्न होत आहेत. आपण ते वेळीच हाणून पाडले नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिमाण भोगावे लागतील, असे मत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री शंकर गायकर यांनी व्यक्त केले. कोतूळ येथील हिंदू धर्म जागृती सभेस संबोधित करताना गायकर बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकर पिचड होते. व्यासपीठावर महंत भास्करगिरी महाराज, बजरंग दल मुबई क्षेत्राचे मंत्री विवेक कुलकर्णी, देवगिरी येथील विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्माचार्य संपर्कप्रमुख जनार्धन महाराज मेटे, बाळासाहेब महाराज कोंढार, माजी आमदार वैभव पिचड उपस्थित होते.
महंत भास्करगिरी महाराज यांनी हिंदू धर्म हा कोणत्याही धर्माचा द्वेष करीत नाही, पण काही लोक जाणीवपूर्वक हिंदू द्वेष करीत आहेत, त्यांना परमेश्वराने सद्बुद्धी द्यावी, असे आवाहन केले. माजी मंत्री मधुकर पिचड म्हणाले, अकोले तालुक्याला प्राचीन इतिहास आहे. आपल्या पूर्वजांनी दहाव्या शतकापासून जे विचार चालू ठेवले, ते भारतीयांना सशक्त पर्याय देणारे आहेत. चुकीचे विचार सांगणाऱ्यांचा मुकाबला करून आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासोबत भारत हे महाशक्ती बनावे, यासाठी काम करावे. तर माजी आमदार वैभव पिचड यांनी भारतीयांच्या मनामनातील हिंदू जागा करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्राचा आदर्श आचरणात आणून पूर्वीचेच अखंड हिंदू राष्ट्र निर्माण व्हावे, असा आशावाद व्यक्त केला. यावेळी शंकर गायकर यांची विश्व हिंदू परिषदेच्या राष्ट्रीय सहमंत्रीपदी व माजी मंत्री मधुकर पिचड यांना सावित्रीबाई फुले पुणे विधापीठाकडून जीवन साधना गौरवाने पुरस्कारीत केल्याबद्दल महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले. प्रारंभी कोतूळ गावातून महंत भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनातून भव्य शोभा यात्रा काढली.
महिला व नागरिकांनी शोभायात्रेचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले. प्रास्ताविक प्रदीप भाटे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय पवार, किशोर आरोटे, रोहित चोथवे, मयूर आरोटे, विशाल बोऱ्हाडे, मनोज लोखंडे, प्रसाद जंगम, जय बोऱ्हाडे, महेश पोखरकर, गणेश पोखरकर, आदींनी प्रयत्न केले. यावेळी विहिपचे नवी मंबई जिल्हा मंत्री लालचंद मलिक, कुलाबा जिल्हा सहमंत्री सतीश देशमुख, पुणे जिल्हा मंत्री संतोष खामकर, नगर जिल्हा सहमंत्री विशाल वाकचौरे यांच्यासह भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, उपस्थित होते.
त्यांना देवाने सद्बुद्धी द्यावी
हिंदू धर्म हा कोणत्याही इतर धर्माचा द्वेष करीत नाही. पण काही लोक जाणीवपूर्वक हिंदू धर्माचा द्वेष करीत आहेत. त्यांना परमेश्वराने सद्बुद्धी द्यावी, असे आवाहन महंत भास्करगिरी महाराज यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.