आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरवर पाणीटंचाईचे सावट:प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात मोठी घट, पाऊस लांबल्यास​​​​ पाणीसाठा पिण्यासाठी राखीव

अहमदनगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाने ओढ दिल्याने अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा, निळवंडे या प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. पाऊस आणखी लांबल्यास या धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

निळवंडेत मुबलक पाणी

अहमदनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात शनिवारी (ता. 18 जून) 32 टक्के, तर भंडारदरा धरणात 24 टक्के पाणीसाठा होता. निळवंडे धरणात मात्र 45 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी अतिरिक्त पाणी निळवंडे प्रकल्पात सोडण्यात आले होते. त्यामुळे या धरणात सध्या अधिक पाणीसाठा आहे. आगामी काही दिवसांत पावसाने ओढ दिल्यास जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

कमी पाऊस

अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत 1 ते 18 जूनपर्यंत 40 मिलीमीटर पेक्षाही कमी पावसाची नोंद झाली आहे. अहमदनगर शहरासह सुपा व अन्य भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या व पाणी साठवण्याची सर्वाधिक क्षमता असलेल्या मुळा धरणात शनिवारी 8 हजार 497 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. भंडारदरा धरणात 2 हजार 695 दशलक्ष घनफूट साठा आहे. निळवंडे धरणात 3 हजार 767 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. गेल्या आठ दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळेच धरणातील पाणीसाठा सातत्याने कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आगामी काळात जिल्ह्यात पाऊस लांबल्यास धरणातील पाणीसाठा हा केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात बाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती

धरणांतील मृत पाणीसाठा हा आरक्षितच ठेवण्यात येतो. भविष्यात अहमदनगर जिल्ह्यात पाऊस लांबल्यास जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा आरक्षित ठेवण्याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती निर्णय घेईल. वेळ पडल्यास खाजगी पाणीसाठे देखील पिण्यासाठी ताब्यात घेतली जातील, असे डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...