आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यामध्ये भोंगे आणि हनुमान चालीसा हा वाद बाळसे धरत आहे. मात्र, या टीव्हीवरील बातम्याने अजिबात विचलित न होता देवळाली प्रवरा येथील अजीजभाई रहीमभाई शेख या मुस्लिम व्यक्तीची गणपती सेवा अविरत सुरू आहे. त्यांची ही सेवा बघून अनेकांना हेवा वाटत आहे. ते गेल्या तीस वर्षांपासून येथील सोसायटी जवळील पावन गणपतीची मनोभावे सेवा करत आहेत. या छोट्याशा पण दखलपात्र गोष्टीमुळे देवळाली प्रवरातील जातीय सलोख्याचे वातावरण किती भक्कम आहे, याची प्रचिती येते.
अजिज शेख यांचे सायकलचे दुकान आहे. ते अगदी पावन गणपती मंदिरा शेजारी आहे. ते सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करतात. त्याच बरोबर गणपतीची सेवादेखील करतात. सकाळची आजान झाल्याबरोबर ते अगोदर गणपती मंदिराचा परिसर झाडून व पाणी मारून स्वच्छ करतात. गणपतीचा पूजापाठ असेल, तर सकाळी त्यांच्या हाताने होतो. गणपतीची सेवा करून देखील ते स्वधर्माची तत्वे काटेकोरपणे पाळतात. गणेश चतुर्थीला भोंग्यावरून गणपतीची गाणी लावणे, ही जबाबदारी त्यांच्याकडेच असते.
त्याच बरोबर महाप्रसाद असेल किंवा अन्य कोणतेही काम ते विनासायास पार पाडीत असतात. ही गणपतीसेवा करताना अथवा मुस्लिम धर्माचे आचरण करताना त्यांच्या मनात कोणताही किंतू परंतु आजपर्यंत आलेला नाही. सेवा हेच मूळ तत्व आहे आणि ते सर्व धर्म शिकवत असतात, असे त्यांचे मत आहे. अजीजभाई हे स्वभावाने अतिशय नम्र आहेत. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार देखील मोठा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.