आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे पासून मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा वाजविण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नगर शहरात मनसे पदाधिकाऱ्यांसह १०० ते १२५ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, नगर शहर व लगतच्या परिसरातील पोलिस ठाण्यांमध्ये भोंगे लावण्यासाठी केवळ ५१ अर्ज दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. भोंगे प्रकरणावरून सध्या राज्यभरात जातीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर शहरातही या मुद्द्यावरून जातीय तणाव निर्माण होऊन कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने नगर शहरातील मनसेच्या दहा ते बारा पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच या मुद्द्यावरून मनसे व्यतिरिक्त इतर सामाजिक संघटना व काही सराईत गुन्हेगारांना ही पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार प्रार्थना स्थळांवर भोंगा व लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. राज्यभरात भोंग्यांचा मुद्दा तापल्यानंतर पोलिस ठाण्यांमध्ये परवानगीसाठी अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या माहितीनुसार, नगर शहर व लगतच्या परिसरातील पोलिस ठाण्यांमध्ये केवळ ५१ जणांचेच अर्ज प्राप्त झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नगर शहर व शहराच्या जवळच्या परिसरातील बहुतांश प्रार्थनास्थळांनी भोंग्याच्या परवानगीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार भोंगे अथवा लाऊड स्पीकर लावण्यासाठी परवानगी आवश्यकच आहे. स्थानिक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कायदेशीर बाबींची पूर्तता करून व कायदा सुव्यवस्थेबाबत विचार करून परवानगी देण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. मात्र अनधिकृत प्रार्थना स्थळांना परवानगीबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.