आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:जगण्याची ‘आकांक्षा’च संपली होती...लॉकडाऊनमध्ये हायवेवर काम करणाऱ्या तृतीयपंथीयांचे हाल

अहमदनगर (नितीन फलटणकर)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन महिन्यांचा काळ कठीण होता. कधी जेवण मिळायचं तर कधी वाट पाहावी लागायची. एकाने दिल्लीवरून किराणा पाठवला. जगण्याची ‘आकांक्षा’च संपली होती. लॉकडाऊनमध्ये होरपळलेल्या तृतीयपंथीयांची कहाणी.

का जगायचं? कशासाठी? लोक टोमणे मारतात. आम्ही आमच्या कष्टाचं खातो. दिवसभर नाक्यावर लोकांना आशीर्वाद देतो. लोक आम्हाला भिकारी म्हणून हिणवतात. लोकांना आशीर्वाद देणं हे काम वाईट आहे का? लॉकडाऊनमध्ये लोक आमच्याकडे पाहून नाकं मुरडत होते. दारं तोंडावर बंद करत होते. दोन महिन्यांचा काळ कठीण होता. कधी जेवण मिळायचं तर कधी कुणी डबा देतंय का याची वाट पाहावी लागायची. महाराष्ट्रातून काहीच मदत मिळेना, मग एकाने दिल्लीवरून किराणा पाठवला. या काळात आमची जगण्याची ‘आकांक्षा’च संपली होती. कहाणी लॉकडाऊनमध्ये होरपळलेल्या तृतीयपंथीयांची.

साधारण ३६ ची असेल आकांक्षा. मास्क लावून औरंगाबादकडून पुण्याकडे जाणाऱ्या हायवेवरील अहमदनगरच्या पुढे लागणाऱ्या शिरूर टोल नाक्यावर ती व तिच्या तीन मैत्रिणी गाड्या थांबवत होते. बहुतांश जण त्यांना पाहून गाडी पळवत होते. आम्ही गाडी थांबवली. तशी ती पुढे आली. ‘टाळी’ वाजवू लागली. तेव्हा कळले ती तृतीयपंथी आहे. वर्षानुवर्षे तिचा हाच व्यवसाय.

तिला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. एक तर गाडी थांबवून कुणी बोलत नाही म्हणून ती जरा गांगरली. आम्ही चौकशी सुरू केली तशी आणखीच सावध झाली. आम्ही सरकारी अधिकारी असल्याची शक्यता तिला वाटली असावी. पण ओळख सांगितल्यावर ती बोलू लागली. लॉकडाऊनमध्ये सर्वच घटकांचे कसे हाल होताहेत किंवा झाले हे सगळ्यांनी पाहिले, अनु‌भवले. पण समाजातील एक असाही घटक आहे की ज्यांचा या काळात कुणीच विचार केला नाही. ‘साहेब, आता लॉकडाऊन उठलाय. सारं सुरू झालंय पण फार हाल झाले हो आमचे.’ ती सांगत होती.

मी व माझ्यासारखे तृतीयपंथी १६ जण अहमदनगरमध्ये राहतो. रोज या नाक्यावर येतो आणि लोकांकडून पैसे घेऊन जगतो. कोरोना नसतानाही लोक आम्हाला विचारत नव्हते. तोच अनुभव आम्हाला लॉकडाऊनमध्येही आला. जमवलेल्या पैशांवर कसेबसे दिवस काढले. लोकांकडे मदत मागायला जायचो. काही जण मदत करायचे तर काही जण नेहमीप्रमाणे गाडीचे दार बंद करायचे. वरून पुन्हा येऊ नकोस असा दमही भरायचे. आकांक्षा हे सांगत होती तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. तिने व तिच्या इतर मैत्रिणींनी लॉकडाऊन काळात काय काय सोसलं हे तिच्या आसवांवरून कळत होतं. तशी मी दहावी शिकलेली. पण काय करणार... कुणी नोकरी देईना. पर्याय नव्हता. जगायचंच होतं. अखेर या टोल नाक्यावर लोकांना थांबवून पैसे घ्यायचे हाच एकमेव मार्ग असल्याचे ती सांगत होती. लॉकडाऊनमध्ये सारेच वाईट वागले असे नाही हे सांगताना तिच्या डोळ्यात चमक जाणवली. लॉकडाऊन कुणासाठी होतो? आपल्यासाठीच ना. असं म्हणत ती लॉकडाऊनचे समर्थन करत होती. काही जणांनी आम्हाला मदत केली. किराणा घरी आणून दिला. आमचे हाल होताहेत हे दिसल्यावर काही जणांनी जेवणाचे डबेही दिल्याचे सांगताना अजून माणुसकी जिवंत असल्याचे ती म्हणाली. आणि म्हणून जगण्याची ‘आकांक्षा’ लॉकडाऊनमध्येही सोडली नसल्याचे सांगत तिने आमचा निरोप घेतला आणि दुसरी गाडी अडवली.जिल्हा अध्यक्ष, तृतीयपंथी संघटना, अहमदनगर. काजल

अखेर लक्ष्मी त्रिपाठींंना फोन
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आम्ही घरातंच अडकलो. आमच्याकडे पैसाअडका नाही. काही सेव्हिंग्ज नाहीत. लोक देतात केवळ त्यावरच आम्ही कसेबसे दिवस काढतो. लॉकडाऊन काळात सारंच बंद झाल्याने हाल झाले. जेवण मिळणं कठीण झालं. काही जण मदतीसाठी पुढे आले खरे, पण ते किती दिवस पुरणार. अनेक नेत्यांना फोन केले. काहींनी सहानुभूती दाखवली तर अनेकांनी परत फोनही करू नकोस असा दम दिला. अखेर लक्ष्मी त्रिपाठींना फोन केला. त्यांच्या माध्यमातून दिल्लीतील मनीष जैन नावाच्या व्यक्तीने आम्हाला रेशन पाठवलं. माणूस म्हणून आमचा विचार कधीच केला जाणार नाही का?

बातम्या आणखी आहेत...