आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ब्रेकिग:शहरातील कचरा संकलनासाठी बंगळुरू; अहमदाबादच्या कंपन्यांनी दर्शवली तयारी

मयूर मेहता | नगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरातील कचरा संकलन व वाहतुकीचे काम करणाऱ्या स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या कामाची मुदत संपुष्टात आली आहे. मनपा प्रशासनाने या कामासाठी मागविलेल्या निविदांना प्रतिसाद देत तीन कंपन्यांच्या निविदा दाखल झाल्या आहेत. पुण्याच्या एका कंपनीसह कर्नाटकातील बंगळुरू व गुजरात मधील अहमदाबाद येथील कंपन्यांनी नगर शहरात काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

सुमारे १० कोटी रुपये वार्षिक खर्च असलेल्या कचरा संकलन व वाहतुकीच्या कामासाठी महापालिकेकडे पुण्यातील बीव्हीजी इंडिया लिमिटेड, बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी व अहमदाबाद येथील श्री जी एजन्सी या तीन कंपन्यांच्या निविदा दाखल झाल्या आहेत. या निविदांची तांत्रिक छाननी करण्यात आली आहे. काही किरकोळ कागदपत्रे वगळता उर्वरित कागदपत्रे पूर्ण असल्याने व्यापारी लिफाफे उघडण्यासाठी आयुक्तांकडे प्रस्ताव दिला जाणार आहे. मात्र, दाखल झालेल्या निविदांपैकी पुण्याच्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या निविदेवर आक्षेप घेण्यात आला आहे.

त्यामुळे निविदा दरपत्रके उघडण्यापूर्वीच बीव्हीजी इंडिया कंपनीची निविदा वादात सापडली आहे. प्रशासनाने या कामासाठी फेरनिविदा मागवाव्यात, अशी मागणीही पुढे आली आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, निविदा पूर्व बैठकीसाठी वीस कंपन्यांनी हजेरी लावली होती. त्यातील केवळ तिघांच्या निविदा आल्या आहेत. त्यात यंदा परराज्यातील मोठ्या कंपन्यांनी नगरमध्ये येऊन तयारी दर्शविली आहे. या कंपनीची कार्यक्षमता व आवाका मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे.

विद्यमान स्वयंभू ट्रान्सपोर्ट स्पर्धेत नाही
गेल्या तीन वर्षांपासून शहरात कार्यरत असलेल्या स्वयंभू ट्रान्सपोर्टने निविदा न भरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चुकीच्या बिलांच्या माध्यमातून महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी या कंपनीवर गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या कंपनीविरोधात सातत्याने नगरसेवक व राजकीय नेते तक्रारी करत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून मनपाने कंपनीला बिलेली दिलेली नाहीत. त्यामुळे स्वयंभू ट्रान्सपोर्टने या कामासाठी निविदा भरली नसल्याचे सांगण्यात येते.

जयपूर मनपाकडून माहिती मागवणार
महापालिकेकडे तीन निविदा दाखल झाल्या आहेत. त्यातील बीव्हीजी कंपनीवर आक्षेप घेण्यात आला आहे. सदर कंपनीला जयपूर महापालिकेने ब्लॅक लिस्ट केल्याचा दावा केला आहे. मात्र, प्राप्त माहितीनुसार केवळ ठेका रद्द केल्याचे समोर येत आहे. यासंदर्भात प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून व बीव्हीजी कंपनीकडून म्हणणे मागवणार आहे. जयपूर महापालिकेकडून नाही यासंदर्भात माहिती मागवण्यात येणार आहे.''-डॉ. शंकर शेडाळे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख, महानगरपालिका.

सेनेच्या शिंदे गट व एमआयएमचा आक्षेप
पुण्याच्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड कंपनीने शहरातील कचरा संकलनाच्या कामासाठी निविदा दाखल केली आहे. मात्र, कामचुकारपणा व कामातील हलगर्जीपणामुळे या कंपनीचा ठेका जयपूर महानगरपालिकेने रद्द केलेला असल्याचे निदर्शनास आणत, या कंपनीला स्पर्धेतून बाद करावे, अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे काका शेळके व एमआयएम पक्षाचे मतीन शेख यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

दरमहा ८० ते ९० लाखांचा खर्च
शहरातील कचरा संकलनापासून ते त्याची विल्हेवाट लावण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी महानगरपालिका दररोज सुमारे साडेअकरा लाख रुपये खर्च करते. यात कचरा संकलन व वाहतुकीचा खर्च सर्वाधिक आहे. आगामी काळात वर्षभरासाठी महापालिकेने सुमारे दहा कोटींचा खर्च प्रास्तावित केला आहे. त्यामुळे येत्या काळात कचरा संकलन व वाहतुकीवर दरमहा ८० ते ९० लाखांचा खर्च होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...