आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावटपौर्णिमेनिमित्त महिला भगिनी वटवृक्षाचे पूजन करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. हल्ली झपाट्याने होणारे शहरीकरण, वाढते प्रदूषण, वृक्षतोड यामुळे गावचे वैभव असणारे व गावखुण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गावांच्या पारावरील वटवृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिलांना वटवृक्ष शोधावा लागतो, अशी परिस्थिती आहे. हीच परिस्थिती बदलावी व निसर्ग संवर्धनाचे काम व्हावे यासाठी मंगळवारी, १४ जून रोजी येणारी वटपौर्णिमा ही निसर्ग संवर्धनाने साजरी करून गावागावात गावठाण परिसरात वटवृक्षांचे वृक्षारोपन व संवर्धन करण्याचा संकल्प माजी सभापती सुनीता गडाख यांनी केला. यानुसार यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व शारदाताई फाउंडेशनच्या वतीने ४ ते ५ फूट उंचीची वटवृक्षांची रोपे १३४ गावांत देण्यात येणार आहे. त्यांचे वृक्षारोपन महिला, ग्रामस्थ एकत्र येऊन करणार आहेत. या वृक्षांचे संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे.
आदर्शगाव मोरयाचिंचोरे येथेही १०० वटवृक्षांची लागवड करून वटवृक्षांची ताटी लावण्यात येणार आहे. याप्रसंगी माजी सभापती सुनीता गडाख, संजय दिघे, गटविकास अधिकारी सुवर्णा माने, वन विभागाच्या सुरेखा जमधाडे आदींसह विविध गावांमधील महिला, तरुणी, सरपंच, ग्रामस्थ उपस्थित राहणार आहे. आयुर्वेदात महत्वाचे असणारे, गावांची शोभा वाढवणाऱ्या वटवृक्षांची लागवड वटपौर्णिमेनिमित्त गावागावांत करून वृक्षारोपन व संगोपन चळवळीला हातभार लावत यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व शारदाताई फाउंडेशनच्या वतीने सदाहरीत निसर्ग संवर्धनाचे मोठे काम होणार आहे.
गावांचे गावपण जपले जावे, यासाठी उपक्रम
गावा गावांत वटवृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे व वटपौर्णिमेनिमित्त सुवासिनी महिला यांना वटवृक्ष पूजनासाठी उपलब्ध व्हावा व गावांची ओळख असलेले वडांचे पार पुन्हा गर्दीने फुलले जावे व गावांचे गावपण जपले जावे, यासाठी वृक्षारोपन केले जाणार आहे, असे माजी सभापती सुनीता गडाख यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.