आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:सावधान ! चोरटे पहाटेपासूनच तुमच्या मागावर

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळसूत्र चोरीचे प्रकार सुरूच, विशेष पथक तैनात करुनही थांबेनात धूमस्टाईल चोऱ्या

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, मंगळसूत्र व दागिने धूमस्टाईलने ओरबाडून नेण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. मध्यंतरी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तैनात केलेले आहे. या पथकाने जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद करुन काही गुन्हेही उघडकीस आणले आहेत. मात्र, तरीही शहरातील चोरीच्या घटना थांबलेल्या नाहीत.

मॉर्निंग वॉकला घराबाहेर आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील पाऊण तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण चोरट्यांनी धूमस्टाईल चोरून नेले. ही घटना शुक्रवारी पहाटे भिस्तबाग चौकाकडून पद्मावती टी पॉइंटकडे जाणार्‍या रस्त्यावर घडली. याप्रकरणी सुनीता हरीदास बांगर (वय ३६, रा. लोकमान्यनगर, भिस्तबाग नाक्याजवळ) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसा पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.

सुनीता बांगर व त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या कुलकर्णी या दोघी महिला भल्या पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्या भिस्तबाग चौकाकडून पद्मावती टी पॉइंटकडे जात असताना पाठीमागून वेगाने एक मोटारसायकल आली. त्यावर तिघे जण बसलेले होते. त्यांच्यापैकेी मध्यभागी बसलेल्या एका चोरट्याने बांगर यांच्या गळ्यातील मिनीगंठण ओरबाडले. तोफखाना पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

काही आठवड्यांपूर्वीच समतानगर परिसरातही चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. एका लाल रंगाच्या मोटारसायलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हे कृत्य केले होते. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकही या चोऱ्यांचा तपास करत आहे.

महिलेच्या प्रसंगावधानामुळे चोरांचा प्रयत्न असफल
शुक्रवारी पहाटे झालेल्या घरफोडीच्या घटनेत सुनीता बांगर यांच्या गळ्यातील मिनीगंठण चोरट्यांनी ओरबाडले. मात्र, त्यांनी आपल्या हाताने ते घट्ट धरून ठेवले. त्यामुळे पूर्ण गंठण चोरट्यांच्या हाती लागले नाही. पाऊण तोळा वजनाचे गंठण चोरट्यांच्या हाती लागले. बांगर यांनी प्रसंगावधान दाखवत आरडाओरडा केल्यामुळे चोरट्यांचा पूर्ण गंठण चोरून नेण्याचा प्रयत्न फसला.

गंठण चोरणाऱ्या गुन्हेगारांना कायद्याचा धाक वाटेना
शहर व जिल्ह्यातील मंगळसूत्र चोऱ्यांच्या घटनांना आळा बसावा, म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकाने काही गुन्ह्यांचा तपास करुन आरोपींना जेरबंद केले. तसेच चोरीला गेलेले सोनेही परत मिळवले. मात्र, तरीही गुन्हेगारांना कायद्याचा धाक वाटत नाही, हे वारंवार होणाऱ्या धूमस्टाईल चोरीच्या घटनांवरुन दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...