आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोसंबीचा भाव कवडीमोल:दरात मोठी घसरण; किरकोळ बाजारात अवघ्या 25 रुपये किलोने विक्री, शेतकरी वर्गात निराशा

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मोसंबी, संत्री या फळांना मोठी मागणी वाढल्याने भाव प्रचंड वाढले होते. या कालावधीत तब्बल 200 ते 280 रुपये किलो दराने मोसंबीची विक्री झाली होती. आता मात्र आवक वाढली असतानाच ग्राहकांकडून मागणी कमी झाल्याने मोसंबीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी (2 सप्टेंबर) अहमदनगरच्या किरकोळ बाजारात अवघ्या 25 रुपये किलो दराने मोसंबीची विक्री झाली.

फळांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू

अहमदनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत फळांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे, पाथर्डी ,जामखेड, शेवगाव तालुक्यात मोसंबीच्या मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत. या तालुक्यांतून मोसंबीची आवक कृषी उत्पन्न बाजार समितीत होते. अहमदनगर जिल्ह्याजवळ असलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर व जुन्नर तालुक्यांतूनही मोठ्या प्रमाणात मोसंबीची आवक होत असते. सध्या या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबीची आवक सुरू असताना भाव मात्र कोसळलेले आहेत.

शेतकरी वर्गात नाराजीचा सूर

शुक्रवारी अहमदनगरमध्ये किरकोळ बाजारात अवघ्या 25 रुपये किलो दराने मोसंबीची विक्री झाली. गेल्यावर्षी कोरोनाच्या कालावधीत अनेक वैद्यकीय तज्ञांकडून रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी लिंबूवर्गीय फळाचा आहारात समावेश करण्याची सूचना दिली जात होती. त्यामुळे या कालावधीत मोसंबी, संत्री या लिंबूवर्गीय फळांची मागणी प्रचंड वाढली होती. बाजारातून मागणी वाढल्याने भाव कडाडले होते. गेल्या वर्षी 200 ते 280 रुपये किलो दराने मोसंबीची विक्री झाली होती. आज मात्र हीच मोसंबी कवडीमोल दराने विकावी लागत आहे. अति पावसामुळे मोसंबी सडण्याची शक्यता गृहीत धरून शेतकरी मोठ्या प्रमाणात मोसंबी विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. त्यातच मोसंबीला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे.

संत्र्याच्या भावात देखील घसरण

मोसंबी बरोबरच संत्र्याच्या भावात देखील काहीशी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. किरकोळ बाजारात 70 ते 90 रुपये किलो दराने सध्या संत्रीची विक्री होत असून, लिंबाचे दर मात्र अजूनही कडाडलेलेच आहेत. एप्रिल - मे महिन्यात उन्हाचे चटके वाढल्याने लिंबांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. चक्क 250 ते 350 रुपये किलो दराने लिंबाची या कालावधीत विक्री झाली होती. गेल्या महिन्याभरापासून भाव कमी झाले असले तरी सर्वसामान्यांच्या आवाक्यात मात्र अजूनही लिंबू नाहीत.

बातम्या आणखी आहेत...