आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ब्रेकिग:पश्चिमेचे पाणी वळवण्यासाठी काढली बायोडायव्हर्सीटी सर्वेक्षणाची निविदा

दीपक कांबळे | नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील भंडारदरा धरणात पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळवण्यासाठी हिवरा व साम्रद योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत भंडारदरा धरणात उल्हास खोऱ्यातून तब्बल १ हजार २८६ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध येणार आहे. योजनेसाठी अभयारण्याचे क्षेत्र बाधित होत असल्याने, जैवविविधता (बायोडायव्हर्सीटी) सर्वेक्षण रखडले होते. परंतु, नुकतेच या सर्वेक्षणासाठीची निविदा प्रक्रिया लाभक्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत राबवण्यात आली आहे. वनक्षेत्र संपादनाच्या दृष्टीने हे सर्वेक्षण महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडील गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी ३० प्रवाही योजना राबवण्यात येणार आहेत. त्यापैकी १४ योजनांची कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली असून १.७ अघफू पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले आहे. जिल्ह्यातील भंडारदरा धरणासाठी हिवरा व साम्रद या दोन महत्वपूर्ण योजनांकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

वनक्षेत्र बाधित होत असल्याने जैवविधता सर्वेक्षण करण्याचे आदेश १२ ऑक्टोबर २०२१ च्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत बायोडाव्हर्सिटी सर्वे करून अहवाल वन्यजीव मंडळापुढे सादर करण्याचे आदेश दिले होते. दोन वर्षांत सर्वेक्षणच होऊ शकले नाही, त्यामुळे योजनेची प्रत्यक्ष कार्य‌ाही रखडली आहे. प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत बायोडाव्हर्सीटी सर्वेसाठी निविदा प्रक्रिया राबवली, परंतु अद्याप कार्यारंभ आदेश दिले नसल्याची माहिती समजली. प्रत्यक्षात कामाला सुरूवात होण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.

कार्यारंभ आदेश दिले जातील
हिवरा व साम्रदसाठी निविदा प्रक्रिया राबवली असून अनामत रक्कम भरण्यास सांगितले आहे. परंतु, निवडणुकांमध्ये कार्यारंभ आदेश दिले नाहीत. परंतु, आचारसंहितेनंतर कार्यारंभ आदेश दिले जातील. पुढे सर्वेक्षण अहवाल वन्यजीव मंडळासमोर परवानगीसाठी ठेवला जाईल.''
कैलास ठाकरे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा.

किती जमीन संपादीत होणार
हिवरा प्रकल्पासाठी १५.२५ हेक्टर क्षेत्र संपादीत करावे लागणार आहे, त्यापैकी खासगी क्षेत्र २.२५ हेक्टर अभयारण्य १३ हेक्टर आहे. तर खासगी साम्रद प्रकल्पासाठी सुमारे २२ हेक्टर जमीन संपादनाची आवश्यकता आहे, त्यापैकी १६ हेक्टर खासगी तर ६ हेक्टर क्षेत्र अभयारण्य असणार आहे.

असा आहे अंदाजित खर्च
उल्हास खोऱ्यातून ६५१.९१ दशलक्ष घनफूट पाणी वळवण्यासाठीच्या हिवरा योजनेवर सुमारे ८९ कोटी १७ लाख तर साम्रद योजनेसाठी ६५ कोटी ४५ लाख रूपये खर्च अपेक्षीत आहे. सद्यस्थितीत दोन्ही योजनांवर अंदाजीत १५४ कोटी खर्च होणार आहेत. परंतु, योजनेला होत असलेल्या विलंबामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणावर किती खर्च होणार
वनक्षेत्रात बायोडायव्हर्सीटी (जैवविविधता) सर्वेक्षणासाठी हिवरा व साम्रद योजनेसाठी सुमारे दहा लाख खर्च येणार आहे. त्यापैकी एका योजनेसाठी सात लाख तर दुसऱ्या योजनेसाठी सुमारे तीन लाख खर्च येणार आहे. यापोटी एक टक्का अनामत रक्कम भरण्याबाबत निविदाधारकाला प्रशासनाने कळवले आहे.

अनामत रक्कम भरण्याचे आदेश
जैव विविधता सर्वेक्षणासाठी निविदा प्रक्रिया राबवली, त्यात सुमारे दहा टक्के कमी दराने निविदा दाखल झाल्या होत्या. प्रशासनाने संबंधित एजन्सीधारकांना एक टक्का अनामत रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अकोले तालुक्यात ११ ग्रामपंयात निवडणुका होऊ घातल्या आहेत. आचारसंहितेमुळे सर्वेक्षणाच्या कामाला कार्यारंभ आदेश दिला नाही.

बातम्या आणखी आहेत...