आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधश्रद्धा:नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या‎ मुख्य प्रवेद्वारावरच "काळी बाहुली''‎, इमारतीवर लावलेली बाहुली 15 महिन्यांनंतरही हटेना‎

बंडू पवार | नगर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंधश्रद्धेचा प्रचार आणि प्रसार रोखण्याची जबाबदारी‎ असलेल्या नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य‎ प्रवेशद्वारावरच चक्क "काळी बाहूली'' लटकवल्याने‎ आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तत्कालीन‎ जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कार्यकाळात‎ सुरू झालेल्या या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या‎ प्रवेशद्वारावर लावलेली काळी बाहुली १५ महिन्यांनंतरही‎ आजही तिथेच कायम आहे.‎

अंधश्रद्धेचा प्रसार व प्रचार रोखण्याची जबाबदारी महसूल‎ यंत्रणेबरोबरच पोलिस यंत्रणेवरही आहे. २९ डिसेंबर २०२१‎ ला नगरचे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय नगर -छत्रपती‎ संभाजीनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहाच्या‎ पाठीमागे सुरू झाले होते. महाविकास आघाडीच्या‎ कार्यकाळात तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात‎ यांच्या प्रमुख उपस्थितीत या नवीन जिल्हाधिकारी‎ कार्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण झाले होते.

तत्कालीन‎ जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले हे देखील या‎ कार्यक्रमाला उपस्थित होते. या इमारतीचे लोकार्पण‎ झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावरच्या मुख्य‎ लाकडाच्या प्रवेशद्वारावर "काळी बाहुली'' लावली होती.‎ तब्बल पंधरा महिने उलटूनही ही काळी बाहुली‎ प्रवेशद्वारावरून काही हटलेली नाही. त्यामुळे आश्चर्य‎ व्यक्त केले जात आहे.

विशेष म्हणजे महाविकास‎ आघाडीच्या कालावधीत आमदार निलेश लंके यांचे‎ उपोषण सोडवण्यासाठी आलेले तत्कालीन उपमुख्यमंत्री‎ अजित पवार यांनी देखील या इमारतीची पाहणी करून या‎ देखण्या इमारतीचे कौतुक केले होते.‎

महसूलमंत्री, जिल्हाधिकारी बदलले "काळी बाहुली'' मात्र कायम‎

वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे‎ अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत‎ नियमावली तयार करण्यासाठी व‎ चर्चा करण्यासाठी‎ जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली‎ एक समिती गठीत केली जाते. मात्र‎ नगर जिल्ह्यात आतापर्यंत ही‎ समितीच गठीत करण्यात आलेली‎ नाही. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन‎ समितीकडून पाठपुरावा देखील‎ करण्यात आला होता.

अंधश्रद्धेचा‎ प्रसार करणे देखील चुकीचे‎ आहे.राज्यघटनेप्रमाणे वैज्ञानिक‎ दृष्टिकोन ठेवून काम करणे अपेक्षित‎ आहे. अशा प्रकारची बाहुली लावणे‎ वैज्ञानिक दृष्टीकोनातून विरोधी‎ भूमिका आहे.‎ रंजना गवांदे, सदस्य, राज्य कार्यकारिणी‎ अंधश्रद्धा निर्मूलन समिती,‎ तत्कालीन महाविकास आघाडीच्या कालावधीत‎ नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वास्तूचे‎ तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या‎ हस्ते लोकार्पण झाले होते.

त्यानंतर राज्यात सत्तांतर‎ होऊन राधाकृष्ण विखे हे महसूल मंत्री झाले. शिवाय‎ तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची‎ देखील बदली झाली. नवीन जिल्हाधिकारी सिद्धाराम‎ सालीमठ आले, तरी देखील जिल्हाधिकारी‎ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेली "काळी‎ बाहुली'' मात्र अद्यापही कायम आहे.‎