आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आशीर्वाद द्या, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांना साकडे

पाथर्डी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमचे दर्शन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांला नवीन ऊर्जा देणारे ठरेल. खूप दिवस झाले भेट नाही. येणाऱ्या काळासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आशीर्वाद द्या, असे साकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना घातले. मुंडे यांनी नगरमार्गे न जाता पाथर्डी-शेवगावमार्गे औरंगाबाद येथे जाऊन मध्यरात्री शेवगावच्या बसस्थानक चौकात चहाच्या टपरीवर सुमारे अर्धा तास निवडक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांशी मुंडे यांचा वाढलेला संपर्क आमदार राजळे यांच्या पुढील पक्षांतर्गत आव्हाने अधिक तीव्र करणारा ठरण्याची शक्यता आहे.

पाथर्डी-शेवगाव मतदार संघावर माजी मंत्री पंकजा मुंडे यांची चांगली पकड असून गेल्या काही दिवसापासून त्यांनी खास कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. विविध भाषणांमधून पंकजा मुंडे यांनी आमदार मोनिका राजळे यांचा माझी बहीण असा उल्लेख केला. अलीकडील काळात मात्र दोघींमधील दुरावा वाढल्याचे चित्र मतदारसंघात निर्माण झाले. मागील महिन्यात विवाह समारंभानिमित्त खासदार डॉ. प्रीतम मुंडे व माजी मंत्री पंकजा मुंडे पाथर्डीत आल्या होत्या. मात्र, आमदार राजळे आजारी असल्याने येऊ शकल्या नाहीत. असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

शनिवारी आमदार सुरेश धस यांच्याकडे सांत्वन भेटीसाठी पंकजा मुंडे आष्टीला गेल्या. तेथे भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांची भेट घेऊन खासदार-आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. तेथे भेट झाल्यानंतरही पाथर्डीमार्गे औरंगाबादला जाण्याचा मुंडे यांचा आग्रह मान्य करण्याच्या निर्णयाची माहिती सर्वांनीच वैयक्तिक पातळीवर ठेवली.

मुंडे यांच्या सहाय्यकाने रात्री साडे अकराच्या दरम्यान माणिकदौंडी सोडल्यावर पाथर्डीतील मुकुंद गर्जे यांना फोन करून रस्त्यावर बोलावून घेत पाच-दहा मिनिटे थांबून आगामी राजकीय वातावरणाची माहिती घेतली. शेवगाव येथे अरुण मुंडे निवडक कार्यकर्त्यांसह उभे होते. तेथे चहा घेत उपस्थित कार्यकर्त्यांना सल्ला पंकजा मुंडे यांनी देत पुढे चालत रहा, असे सांगितले. मुंडे यांच्यातर्फे कार्यकर्त्यांना निरोप दिले गेले. पण आमदार मोनिका राजळे यांना निरोप देण्याबाबत फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे व आमदार मोनिका राजळे यांच्या राजकीय संबंधाचा विषय मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे.

भारतीय जनता पक्षांतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत येताहेत
आगामी पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकाकडुन वापरले जाणारे “परळी कनेक्शन” आमदार राजळे कशा पद्धतीने डिस्कनेक्ट करतील, यावर मतदारसंघाची राजकीय दिशा ठरणार आहे. गेल्या चार महिन्यातील राजकीय घडामोडीमुळे आमदार मोनिका राजळे समर्थक सुद्धा सावध प्रतिक्रिया देत आहेत. आमदार राजळे गटाशी सुरक्षित अंतर ठेवून वाटचाल करीत असल्याने भाजप अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत येत आहेत. माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड व पंकजा मुंडे यांची पुढील महिन्यातील भेट नव्या समीकरणांना पडद्यावर आणणारी ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...