आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप:नळपाणी योजनेची वीज तोडल्यामुळे ब्राह्मणवाडा गावकऱ्यांचा रास्ता रोको; महिलांना करावा लागतोय पाणीटंचाईचा सामना

अकोले2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील ग्रामस्थांना नळपाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायत योजनेचा वीजबिल भरणा केला नाही म्हणून महावितरणकडून दोन दिवसांपूर्वी नळयोजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे दोन दिवसापासून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांमथून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याचा परिणाम गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला. आंदोलकांबरोबर महसूल, पोलिस प्रशासनाने चर्चा करुन आंदोलन मागे घ्यावे यासाठी प्रयत्न करण्यात आले, पण सर्वप्रथम नळपाणी पुरवठा योजनेची वीज जोडून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीवर महिला व आंदोलक ठाम राहिल्याने रास्तारोको आंदोलन बराच वेळ सुरूच राहिले.

ब्राह्मणवाडा गावातून बोटा, कोतूळ व ओतूर मार्गावर वाहनांची वाहतूक खोळंबा झाल्याने वाहनाची मोठी रांग लागली. याचा फटका प्रवासी, महिला व लहान मुलांना व विद्यार्थ्यांना बसला. नळपाणी योजनेची वीज जोडल्याशिवाय रास्ता रोको मागे घेणार नाही, रस्त्यावरून आंदोलक हटणार नाहीत, भले आमच्यावर कायदेशीर कारवाई करा पण पिण्याचे पाणी मिळू न देणाऱ्या महावितरणच्या राजूर येथील अभियंत्यांवर पहिला गुन्हा दाखल करा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी गावकऱ्यांना समजावून समाधानकारक मध्यस्ती केल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.

ब्राह्मणवाडा गावातील नळपाणी योजनेचे वीजबिल भरमसाठ वाढवून दिल्याने पूर्ण रक्कम भरणे ग्रामपंचायतला शक्य होत नाही. ग्रामपंचायतने थोडीफार रक्कम वीज बिलापोटी भरल्यानंतरही महावितरणकडून तगादा लावत वीजबिल भरणा करण्यासाठी आठवडेबाजाराचे दिवशीच वीज जोडणी तोडली. यामुळे तीन दिवसांपासून गावकऱ्यांना व विशेषकरून महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याचा उद्रेक होऊन गुरुवारी गावकऱ्यांनी आंदोलन केले. आंदोलनात सरपंच संतोष भांगरे, उपसरपंच सुभाष गायकर, सागर गायकर, गोकुळ आरोटे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र शिवाजी आरोटे, संगीता गायकर, रुपाली जाधव, कविता रोकडे, शालुबाई कोंडे, शिला जितेंद्र आरोटे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते.

महावितरणचा पूर्ण वीज बिल भरण्याचा आग्रह
मार्च महिन्यातही संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कारभाराविरुद्ध आंदोलन करून येथील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा आंदोलन केले होते. त्यावेळी झालेल्या तडजोड बैठकीनुसार काही रक्कम ग्रामपंचायतीने भरली होती. मात्र पूर्ण वीज बिल भरण्याचा आग्रह महावितरणकडून सुरूच राहिल्याने व ती ग्रामपंचायतीकडून पूर्ण न झाल्याने महावितरण अधिकाऱ्यांनी पाणी योजनेची वीज खंडित केली.

बातम्या आणखी आहेत...