आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामान्याला लाजवेल, असे पदलालीत्य करीत बहारदार फॅशन शो, हातावर काढलेली आकर्षक मेंदी, बुध्दीमत्ता स्पर्धा अन् लक्षवेधी रांगोळी.. कोणताही संवाद होत नसताना, फक्त हात व डोळ्यांच्या इशाऱ्यावर सगळा कार्यक्रम चाललेला.. निमित्त होते, विमेन्स डेफ असोसिएशन संचलित, मूकबधीर महिला संघटना अहमदनगर शाखेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित मूकबधीर महिलांच्या मेळाव्याचं.. मेळाव्यास आकांक्षा दिव्यांग पूनर्वसन केंद्राच्या संचालिका सविता काळे प्रमुख अतिथी होत्या. पुण्याच्या मूकबधीर संघटनेच्या प्रमुख प्राची सप्तर्षी, नगरमधील संघटनेच्या सुहासिनी गांधी उपस्थित होत्या. सकाळी कार्यक्रमाचे उद्घाटन झालं. हळदी-कुंकू लावून गुलाबपुष्प देऊन आनंदाने प्रत्येकीचं स्वागत केलं.
दिवसभराच्या कार्यक्रमाची रुपरेषा व प्रास्तविक, औपचारिक दीपप्रज्ज्वलनाने झाली. बहारदार फॅशन शो, बुद्धीमत्ता स्पर्धा, मेंदी, रांगोळी स्पर्धेत सर्व जणी उत्साहाने सहभागी झाल्या. परीक्षक म्हणून सविता काळे व प्राची सप्तर्षी यांनी काम पाहिलं. सुग्रास भोजनाचा आस्वाद साऱ्यांनी घेतला. दुपारी आलेल्या प्रत्येकीने स्वपरिचय करून दिला. त्यानंतर बहारदार नृत्य, विनोदी कार्यक्रम झाले.
विजेत्या महिलांना अध्यक्ष, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सविता काळे म्हणाल्या, की ‘शब्देविणू संवादू..’ अशी अवस्था झालीय. सुंदर नियोजनबद्ध, आनंददायी, चैतन्यदायी कार्यक्रमात स्त्रीशक्तीचा सुंदर अविष्कार, तुमची जिद्द, आशावाद, कृतिशील विचार सगळं काही थक्क करणारं आहे. हे सर्व आमच्यासारख्या स्त्रियांसाठी प्रेरणादायी आहे. प्राची सप्तर्षी यांनी महिलांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी मूकबधीर संघटनेच्या कार्यकारिणी सदस्या रीना धोका, कोमल मोरे, वर्षा कर्डिले, मनीषा ढाकणे, रुपाली कडूस यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.