आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नववधुला सासरी आणण्यासाठी वऱ्हाडी मंडळींकडून अनेकविध प्रयोग सुरु असतात. चारचाकीतून मिरवत नेण्याची आता फॅशनच झाली आहे. चारचाकी नसली, तर कमीपणा समजला जातो. मात्र, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडल्याने चारचाकीला फाटा देत खांडगावमध्ये नववधुला बैलगाडीतून वाजतगाजत सासरी नेण्लेयात आले. या लग्नाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.
संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील खांडेश्वर मंगल कार्यालयात रविवारी साहेबराव साकुरे यांचा मुलगा सतीश व निमगावपाग्याचे बाबासाहेब कानवडे यांची कन्या कोमल यांचा विवाह सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे दोन्ही कुटुंबांनी काटेकोर पालन केले. या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट म्हणजे नववधुला सासरी नेण्यासाठी चारचाकीऐेवजी पारंपरिक बैलगाडी सजवण्यात आली होती. पाटील घराण्याचा जसा रुबाब, तसाच रुबाब बैलांचा होता. बैलांना सजवण्यात आले होते. वास्तविक साकुरे परिवाराकडे चारचाकी वाहनांची कमतरता नाही. मात्र, इंधनाचे गगनाला भिडलेले दर पाहता इंधनाच्या खर्चाला फाटा देत दरवाढीच्या परिणामाचा संदेश या माध्यमातून समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न साकुरे परिवाराने केली आणि तो यशस्वी झाल्याची चर्चा विवाहप्रसंगी सुरु होती. नववधुची पारंपरिक बिदाई हा कुतुहुलाचा विषय बनला. साकुरे परिवाराच्या या संदेशाचे नागरिकांनी स्वागत करत रस्त्यावर उभे राहून नववधु-वराला आशीर्वाद देत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रस्त्याने जाणाऱ्या अनेकांनीही आपली वाहने थांबवून नवदांपत्याची ही वरात कुतूहलाने पाहिली.
कोरोनामुळे निर्बध पाळणे आवश्यक
इंधन दरवाढीची झळ आणि कोरोनामुळे शासनाने लागू केलेले नियम यांची झळ जिल्ह्यातील अनेक लग्नसमारंभांना बसत आहे. मात्र, काही मंडळी नियम आणि निर्बंध झुगारत लग्नसमारंभात प्रचंड खर्च करताना दिसतात. शासनाने केवळ ५० जणांनाच समारंभात सहभागी होण्याची परवानगी दिलेली असताना दोन-तीन हजार लोक काही लग्नसमारंभांत गर्दी करत असल्याचे पहायला मिळते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.