आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवा विचार:स्वयंचलित हवामान केंद्र उभारून निघोजचा शेतकरी करतो इस्रायलप्रमाणे शेती, लावणीपासून काढणीपर्यंतचे नियोजन करून काढतो भरघोस उत्पादन

गणेश देलमाडे | नगर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवामान केंद्राद्वारे पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाशाची तीव्रता, वाऱ्याचा वेग आदी नोंदी नोंदवल्या जातात

आधुनिक शेती म्हटले की, आपण इस्रायल व युरोपातील देशांतील शेतीचे दाखले देतो. परंतु पारनेर तालुक्यातील निघोज येथील राहुल रसाळ या तरुण शेतकऱ्याने शेतात स्वयंचलित हवामान केंद्र (वेदर स्टेशन) उभारले. या केंद्रात होणाऱ्या हवामानाच्या नोंदी व निर्देशानुसार पिकांची लावणी, फवारणी व काढणीपर्यंतचे नियोजन करून ते आधुनिक शेती करीत आहेत.

हवामान केंद्राद्वारे पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाशाची तीव्रता, वाऱ्याचा वेग आदी नोंदी नोंदवल्या जातात. त्यामुळे पिकासाठी आवश्यक पाणी, अन्नद्रव्ये, रोग व किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पीक संरक्षण उपाय, अतिवृष्टी, गारपीट यामुळे होणारे नुकसान टाळता येत आहे. हवामान केंद्राचे ९५ टक्क्यांपर्यंत अंदाज अचूक ठरत असल्याने भरघोस उत्पादन ते काढत आहेत. एवढेच नव्हे, तर शेतातील माती, पाणी, ओलावा, जमीन व पाण्यातील ऑक्सिजन मोजण्याची सर्व यंत्रे राहुल यांच्याकडे आहेत. तंत्रज्ञानाच्या आधारे शेती करत ते दरवर्षी द्राक्ष, डाळिंब, फळभाज्या यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.

राहुल यांची निघोज व जवळा शिवारात ४५ एकर शेती आहे. अॅग्रीचा डिप्लोमा केल्यानंतर त्यांनी २००६ पासून आधुनिक शेती करण्यास सुरुवात केली. २०१५ मध्ये त्यांनी ३९ हजार रुपये खर्च करून शेतात स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी केली. ईसीमीटरने जमिनीतील क्षार मोजून खतांच्या संतुलित मात्रा पिकांना देतात.

रसाळ यांच्याकडे १९ एकर क्षेत्रावर द्राक्षे, १५ एकर डाळिंब, ४ एकर शेवगा, २ एकर टोमॅटो, एका एकरावर जंगली कर्टुल्याची शेती आहे. यातच द्राक्ष आणि कारल्याचे आंतरपीक ते घेतात. द्राक्षांची युरोप, यूके, नेदरलँड या देशांत निर्यात केली जाते. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी द्राक्षाची मोठी खरेदीदार आहे.

परिसरातील शेतकऱ्यांनी केंद्राच्या नोंदीचा वापर करावा

रसाळ यांच्या स्वयंचलित हवामान केंद्रात शेती व शेतीनिहाय आवश्यक नोंदी नोंदवल्या जातात. त्यामुळे पिकांचे नुकसान टाळता येऊ शकते. स्वयंचलित हवामान केंद्रावरून संकलित केलेल्या माहितीचा उपयोग ९ किमीच्या परिसरातील शेतकऱ्यांनी करावा. - विलास नलगे, कृषी उपसंचालक, अहमदनगर.

वेदर स्टेशनचे फायदे

पिकांवरील संभाव्य कीड व राेगाच्या नियंत्रणासाठी वेदर स्टेशनचा फायदा होतो. खर्चाची बचत होते. शेतमालाची गुणवत्ता राहते. हवामानाच्या अंदाजाच्या नोंदीचा उपयोग शेतीकामाच्या व्यवस्थानासाठी होतो. एका मॉनिटरवर रोजच्या नोंदीचा तपशील, मागील पाच वर्षांपर्यंतचा डाटा सेव्ह होतो. गतवर्षी कधी पाऊस झाला, किती झाला याच्या अचूक नोंदी मोबाइलद्वारे मिळतात.

बातम्या आणखी आहेत...