आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मनुष्याच्या जीवनात प्रतिकुल परिस्थिती असतानाही अद्भुत गोष्टी घडून येऊ शकतात, असे प्रतिपादन नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिराचे महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी केले. ते सोनई येथील जगदंबा देवी मंदिराचे प्रांगणात मार्गशीर्ष वद्य एकादशीनिमित्त आयोजित कीर्तनप्रसंगी बोलत होते. उद्धव महाराजांनी संत ज्ञानेश्वर माऊली यांचा नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, हा अभंग निरूपणासाठी घेतला होता.
जगदंबा देवी मंदिर प्रांगणात दर महिन्याच्या वद्य एकादशीला हरिकीर्तन करण्याचा नित्यनेम संत ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट नेवासाचे विश्वस्त व ज्येष्ठ नेते विश्वास गडाख यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली सोनई ग्रामस्थांनी व भजनी मंडळाने सुरू केला. या मासिक कीर्तन मालिकेतील या वर्षातील डिसेंबर महिन्याचे शेवटचे पुष्प उद्धव महाराज यांनी सोमवारी वद्य एकादशीनिमित्त गुंफले.
उद्धव महाराज या अभंगावर चिंतन करताना म्हणाले की, नामस्मरण हाच चांगला नित्यनेम असून तो परमेश्वराला प्रिय आहे. देव आणि भक्त यांच्या सुखाला नित्यनेमच कसा कारणीभूत ठरतो यासाठी त्यांनी पंढरपूरची नित्य वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा दाखला दिला. महाराज म्हणाले, परमार्थ ही आपली गरज म्हणून त्याकडे बघावे. अंत:करण तृप्तीसाठी परमार्थाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा हरिनामाच्या नित्यनेमाचा संकल्प विश्वासमामांच्या मार्गदर्शनाखाली सोनई ग्रामस्थांनी सुरू केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले.
कीर्तनाला विश्वासराव गडाख, मुळा कारखान्याचे संचालक कारभारी डफाळ, सोनई सोसायटीचे उपाध्यक्ष आप्पासाहेब निमसे, मुळा बँकेचे अध्यक्ष सिताराम झिने, विनायक दरंदले, डॉ. राधाकृष्ण सुकाळकर, भागवत सुकाळकर, गजानन दरंदले, डॉ. रामनाथ बडे, किसन शिकारे, वसंत दरंदले, लक्ष्मण दरंदले, शंकर दरंदले, बद्रीनाथ काळे यांच्यासह पंचक्रोशीतील भजनी मंडळ व भाविक उपस्थित होते. सरत्या वर्षात कीर्तन सेवा घेतलेल्या भाविकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उपस्थित भाविकांना कारभारी डफाळ यांच्या वतीने फराळाचा महाप्रसाद देण्यात आला. शेवटी गोविंद महाराज निमसे यांनी सर्वांचे आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.