आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जामखेड रोडवर अपघात:माय-लेकीचा जागीच मृत्यू, तिघे जखमी; चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाडावर आदळली गाडी

प्रतिनिधी | अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीडहून मुंबईकडे जाणाऱ्या चार चाकी वाहनाचा आज पहाटे भीषण अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडावर गाडी आदळली. यात माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन जण जखमी झाले आहेत.

चालकाविरोधात गुन्हा दाखल

नगर तालुक्यातील निंबोडी या गावाजवळ हा अपघात झाला. या प्रकारणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातामध्ये चालकाची पत्नी विनिता दीपक उघडे (वय 26) व मुलगी रास्वी दीपक उघडे (वय दीड वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे कुटुंब मुलुंड येथील रहिवासी आहे. तर, दीपक सुधाकर उघडे (वय 30), एक महिला व तिची मुलगी जखमी झाले आहेत.

दीपक उघडे हे कुटुंबासह बीड येथून मुंबईकडे जात होते. नगर तालुक्यातील निंबोडी गावात आल्यावर त्यांचा गाडीवरील ताबा सुटून गाडी लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली. हा अपघात एवढा मोठा होता की आवाजामुळे आजूबाजूचे नागरिक तात्काळ या ठिकाणी जमा झाले. मार्गावरून जाणाऱ्या अनेक गाड्या या ठिकाणी थांबल्या होत्या.

एकाची स्थिती गंभीर

घटनेची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवले. घटनेची माहिती मृतांच्या नातेवाईकांना दिल्यानंतर नातेवाईक नगरच्या दिशेने निघाले. तर, दुसरीकडे जखमींवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून यातील एकाची परिस्थिती गंभीर असल्याचे समजते. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचे अमोल नवनाथ आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक सुधाकर उघडे (वय 30) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपाययोजना करण्याची गरज

दरम्यान, गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. पोलिस प्रशासनाने वारंवार अपघात होणारे ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. त्या ठिकाणी अपघात टळावेत, या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. नगर शहरातही काही प्रमुख चौकात दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत. मात्र, शहर वाहतूक शाखा, महामार्ग पोलिस यांच्याकडून अपघात टाळण्यासाठी, वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी उपाययोजना होताना दिसत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...