आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस वृत्त:वाढदिवस घरीच साजरे करा, पोलिस ठाण्यात नको ; विशेष पोलिस महानिरीक्षकांचे आदेश

नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहर व जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात व कार्यालयामध्ये पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले वाढदिवस साजरे करू नयेत, असे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत. आपले वाढदिवस घरी साजरे करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

काही अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाण्यांमध्ये किंवा कार्यालयात वाढदिवस सार्वजनिक स्वरुपात साजरे करत आहेत. हे वाढदिवस साजरे करताना बर्‍याच वेळा ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशा व्यक्ती, दारु, मटका व इतर अवैध धंदा करणारे, पोलिसांवर दबाव आणणारे इत्यादी लोकही सहभागी झालेले दिसून आलेले आहेत. त्याच प्रमाणे वाढदिवस साजरा करताना पोलिस ठाण्यामध्ये किंवा कार्यालयात मोठ्या आवाजामध्ये लाऊड स्पीकर लावून त्यावर नाचण्याचे प्रकार होत आहेत. याचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा डागाळली जावून समाजामध्ये एकवेगळाच संदेश जात आहे. जनतेत पोलिसांबद्दल प्रतिकूल व वाईट मत तयार होत आहे, असे आदेशात म्हटले आहे.

आपला वाढदिवस साजरा करणे ही वैयक्तिक बाब असून अधिकारी व अंमलदार यांनी वैयक्तिक स्तरावर आपले वाढदिवस साजरे करणे आवश्यक आहे. यापुढे पोलिस ठाणे आवारात किंवा कार्यालयात कोणाचेही वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरे करण्यात येवू नयेत. पोलिस अधीक्षक यांनी याबाबत अखत्यारीतील सर्व अधिकारी व अंमलदारांना सूचना द्याव्यात असे प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, बी. जी शेखर यांनी आदेशात म्हटले आहे.