आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोपरगाव नगर परिषदेने घरपट्टी करात अवास्तव वाढ केली अाहे. त्यामुळे नागरिकांत रोष निर्माण झालेला आहे. या वाढीव घरपट्टी कर आकारणीबाबत फेरविचार करण्याची मागणी भाजप, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) ने यापूर्वी नगर परिषद प्रशासनाकडे केली होती; परंतु अद्यापही पालिका प्रशासनाने यासंदर्भात कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे या अवास्तव घरपट्टी आकारणीच्या निषेधार्थ भाजप, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) ने २७ सप्टेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निवेदन भाजप आणि मित्रपक्षांच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.
भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, शिवसेनेचे माजी नगरसेवक योगेश बागूल, रिपाइं (आठवले गट) चे शहराध्यक्ष देवराम पगारे यांनी हे निवेदन नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. कोपरगाव नगर परिषदेने नागरिकांवर अवास्तव घरपट्टी कराचा बोजा लादल्यामुळे नागरिक मोठ्या अडचणीत सापडले असून, त्यातून नागरिकांना दिलासा मिळवूनड देण्यासाठी भाजप, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) ने आता साखळी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण भांडवली मूल्यावर करण्याचे काम आर. एस. कंन्स्ट्रक्शन कंपनीला दिलेले होते; परंतु या कंपनीने मिळकतीचे मूल्यांकन निश्चित करताना कायदेशीर तरतुदींचे सर्रास उल्लंघन केले आहे. आर. एस. कंन्स्ट्रक्शन कंपनीने दिलेल्या अहवालाची कुठलीही शहानिशा न करताच नगर परिषद प्रशासनाने या कंपनीच्या सदोष अहवालाच्या आधारे एकांगी पध्दतीने घरपट्टी करामध्ये अवास्तव आणि भरमसाठ वाढ करून शरवासीयांवर वाढीव घरपटटीचा बोजा टाकला आहे. ही जाचक आणि अवास्तव घरपट्टी करवाढ नगर परिषदेने त्वरित मागे घ्यावी अन्यथा येत्या २७ सप्टेंबरपासून भाजप, शिवसेना आणि रिपाइंचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर साखळी उपोषणास बसतील, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.