आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामांतराचा वाद:अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करा, गोपीचंद पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादच्या नामांतराचा वाद अजून शमलेला नसतानाच आता अहमदनगरचे नामांतर करण्याची मागणी पुढे आली आहे. येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला. त्यामुळे 'अहमदनगर' चे नाव बदलून 'अहिल्यानगर' करावे, अशी मागणी भाजप आमदार गोपींचद पडळकर यांनी केली आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नामांतराचे आवाहन केले आहे. त्यामुळे राज्यात आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

कोणता वारसा सांगणार?

अहमदनगरचे नाव बदलून ते अहिल्यागनर करावे, अशी तमाम अहिल्याप्रेमींची भावना असल्याचे पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच, आपण कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात? मुघलशाही की होळकरशाहीचा? अहिल्यानगर नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणाने नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात, हे सिद्ध कराल ही अपेक्षा, असा टोलाही पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तसेच, नामांतराचा निर्णय तातडीने न झाल्यास बहुजन आता जागृत आणि संघटीत झाला आहे, हे लक्षात ठेवा, असा इशाराही पडळकरांनी दिला आहे.

शरद पवारांवर टीका

पडळकर पत्रात म्हणाले की, शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॉम्ब ब्लास्टचा सूत्रधार दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लाँच करण्याचा इव्हेंट वाटतो. तसेच, अहमदनगर येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार यांच्या मुघलशाहीने पोलिस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यापासून रोखले, असा आरोप त्यांनी केला.

अहिल्यामातेने हिंदूसंस्कृतीत प्राण फुंकले

पडळकर पुढे म्हणतात की, हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. देशात मुसलमानी राजवट असताना अहिल्यामातेने हिंदूसंस्कृतीत प्राण फुंकले. हिंदूसंस्कृतीचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे त्यांचा जन्म झाला त्या जिल्ह्याला 'अहिल्यानगर' म्हणून ओळखले जावे, अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे.

रोहित पवारांची टीका

गोपीचंद पडळकरांचे हे पत्र व्हायरल होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पडळकरांवर टीका केली आहे. सामान्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आम्ही विकासाचे राजकारण करतो. मात्र, काही नेते सामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष न देता केवळ राजकारणासाठी असे वाद बाहेर काढतात, अशी टीका त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...