आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृती:शहरांची नावे बदलणे म्हणजे देशाच्या संस्कृतीवरील हल्लाच

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील प्रतिमा आणि प्रतीके बदलली जात आहेत, शहरांची नावे बदलली जात आहेत. हा केवळ शिक्षण, शेती किंवा कामगारांवर नव्हे, तर देशाच्या संस्कृतीवरील हल्ला आहे, अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. राम बाहेती यांनी केली. नालेगाव येथील शिवपावन मंगल कार्यालयात आयोजित पक्षाच्या जिल्हा अधिवेशनाच्या समारोप सत्रात ते बोलत होते.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणाशिवाय या देशाला पर्याय नाही. त्यासाठी आपण आपला पक्ष आणि पक्ष संघटना मजबूत करा, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. राम बाहेती यांनी केले. या जिल्हा अधिवेशनास राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे, राज्य सहसचिव कॉ. सुभाष लांडे, भारतीय महिला फेडरेशनच्या अध्यक्ष कॉ. स्मिता पानसरे, भारतीय किसान सभेचे कॉ. बन्सी सातपुते, जिल्हा सेक्रेटरी शांताराम वाळुंज, आयटकचे जिल्हा सचिव सुधीर टोकेकर, सहसचिव संतोष खोडदे, भारती न्यालपेल्ली, संजय नांगरे आदी उपस्थित होते.

यावेळी राम बाहेती म्हणाले, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राजकारण ही देशातील १३० कोटी जनतेची गरज आहे. त्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डावी आघाडी मजबूत करणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील सर्व धर्म निरपेक्ष पक्षांची आघाडी करणे, त्याच बरोबर भूमी सुधारणा, राशन, रोजगार, व किमान वेतन या जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करणे गरजेचे आहे.

गेल्या ३ वर्षात आपण काय राजकीय भूमिका घेतली व आगामी ३ वर्षांसाठी काय दिशा ठरवली आहे याचा विचार पक्षाने केला आहे. व्यक्तीच्या शहाणपणापेक्षा सामूहिक शहाणपण हे पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण लिहिलेल्या अहवालावर देशभरातून आलेल्या सूचनांनंतर सशक्त बनून विजय वाडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाला पाठवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॉम्रेड संजय नांगरे, बापुराव राशीनकर (शेवगाव), निवृत्ती दातीर (अकोले), माधव नेहे (संगमनेर), सुरेश पानसरे (राहता), भैरवनाथ वाकळे, रामदास वाघस्कर, विकास गेरंगे, कार्तिक पासलकर (नेवासा) यांनी अहवाल वाचन केले. ॲड. सुभाष लांडे यांनी प्रास्ताविक केले. शांताराम वाळुंज यांनी आभार मानले. अधिवेशनाला कॉ. बाबा आरगडे, पांडुरंग शिंदे, ज्ञानदेव पांडूळे, भगवान गायकवाड, कारभारी उगले, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, अर्षद शेख, सगुणा श्रीमल, संदीप इथापे उपस्थित होते.

चर्चा नको, कृती हवी
कॉ. तुकाराम भस्मे म्हणाले, पक्षवाढीसाठी केवळ चर्चा नको तर प्रत्यक्ष कृती कार्यक्रम हवा. त्यासाठी गाव तालुका व जिल्हा पातळीवरील शाखांचे सभासद वाढवणे गरजेचे आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डावी आघाडी मजबूत करणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील सर्व धर्म निरपेक्ष पक्षांची आघाडी करणे, हे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...