आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनास्था:नाल्यांमधील अतिक्रमणांची मुख्यमंत्र्यांकडून दखल

नगर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सीना नदी पात्र तसेच शहरातील ओढे-नाले बुजवून तेथे केलेल्या बांधकामांबाबत दोषींवर कारवाईची मागणी करूनही महापालिका त्याची दखल घेत नसल्याने येथील नागरिक कृती मंचाचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागितली. त्यांनी त्याची तातडीने दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयास आदेश दिल्याने आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक येत्या मंगळवारी (२७ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली आहे.

चंगेडे यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार केली होती. जनतेने केलेल्या तक्रारींवर मनपाकडून कोणतीही कारवाई होत नाही व तक्रारी तशाच प्रलंबित राहतात. नदी पात्रासह ओढे-नाल्यांवर केलेले अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकामांना दिलेली मंजुरी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने याची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला गांभीर्याने आवश्यक कार्यवाहीची सूचना केली आहे. त्यानंतर आता जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाची स्वतंत्र बैठक मंगळवारी केवळ याच विषयासाठी आयोजित करण्यात आली आहे. यासाठी मनपा आयुक्त, मनपातील नगररचना विभागाचे सहायक संचालक, मनपातील अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख व जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाच्या तहसीलदारांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अद्ययावत कागदपत्रे मागवली
बैठकीस स्वतः अद्ययावत माहितीसह उपस्थित रहावे, तसेच या बैठकीची अद्ययावत टिपणी २६ सप्टेंबर पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी, असे आदेश मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी हे आदेश मनपाला दिले आहेत. दरम्यान, तक्रारदार शशिकांत चंगेडे यांनाही या बैठकीस बोलावण्यात आले आहे.

मनपाच्या कागदावरच उपाययोजना?
शहरात मुसळधार पाऊस होऊन सावेडीतील गुलमोहोर रस्त्यावरील नरहरीनगर, पाईपलाईन रस्त्यावरील एकवीरा चौकातील गावडे मळा व शहराच्या अन्य काही भागात घरात पाणी शिरले होते. बुजवलेल्या ओढ्या-नाल्यांमुळे ही समस्या उदभवल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी याबाबत आवाज उठवून बुजवलेले ओढे-नाले खुले करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सर्व्हेक्षणाचे आदेश दिले होते. या सर्व्हेक्षणात सुमारे ४१ ठिकाणी पावसाचे पाणी साठून राहात असल्याचे स्पष्ट झाले होते. बुजवलेल्या ओढ्या-नाल्यांचे प्रवाह मोकळे करण्याचा निर्णयही आयुक्तांनी घेतला आहे. ही सर्व कार्यवाही व उपायोजना केवळ कागदावरच राहिल्या आहेत.