आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना काळात शहरी व ग्रामीण जीवनात मोठे बदल झाले आहेत. घरातील कर्ते पुरुष दगावल्यामुळे बालकांवर काम करण्याची वेळ आली आहे. बालहक्क स्वयंसेवी संस्था व क्राय संस्थेच्या ऑनलाईन सर्वेक्षणानुसार सहा जिल्ह्यात बालकामगार वाढले आहेत. परंतु, जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेकडे ही आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. तथापि, जिल्ह्यात स्वयंसेवी संस्था व प्रशासन बालकामगारांची संयुक्त शोधमोहिम राबवणार आहेत.
ऑनलाईन सर्वेक्षणानुसार अहमदनगर, लातूर, जालना, परभणी, वर्धा आणि नंदूरबार या सहा जिल्ह्यांमध्ये बालकामगार वाढले आहेत. या ६ जिल्ह्यांत २०२० मध्ये २ हजार ५५६ बालकामगार आढळले होते. सन २०२२ मध्ये ही संख्या ३ हजार ३०९ वर जाऊन पोहोचली असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. या जिल्ह्यातील शहरांत हॉटेलमध्ये किंवा घरी कामगार, भिक्षेकरी वा मजूर म्हणून मुले काम करतात, अशी माहिती समोर आली आहे.
परराज्यातील बालके नगरमध्ये करतात काम कोरोना महामारीच्या कालावधीत अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अनेक परप्रांतीयांनी पुन्हा जिल्ह्यात येताना सोबत मुलांनाही घेऊन आले. ही बालके छोटे हॉटेल, लघू उद्योग आदी ठिकाणी सर्रासपणे बालकामगार म्हणून कमी पैशात काम करताना दिसत आहेत. कुटुंबाची गरज म्हणून काम करत असल्याचेही काही बालकांनी सांगितले.
शोध माहिमेत बालकांची मजुरीतून केली मुक्तता ^ कोरोना कालावधीत जिल्ह्यात बालकामगार शोधमोहिम राबवली होती. त्यावेळी ६ बालके सापडली. मात्र, त्यापैकी दोघे जण सज्ञान निघाले. उर्वरित ४ बालकामगारांची सुटका करून त्यांची मजुरीच्या कामातून मुक्तता करण्यात आली. ‘क्राय’चा अहवाल अद्याप आमच्याकडे उपलब्ध नाही.'' महेश सूर्यवंशी, केंद्र समन्वयक चाईल्डलाईन, अहमदनगर.
नागरिकांनी तक्रार करावी, कारवाई होईल ^ जिल्ह्यात कुठेही बालमजूर आढळल्यास तत्काळ बालकांसाठी काम करणाऱ्या मालक स्वयंसेवी संस्था आणि बाल कामगार आयुक्त कार्यालयात माहिती द्यावी. त्या तक्रारीवर कार्यवाही केली जाईल. स्वयंसेवी संस्था आणि बालकामगार आयुक्त कार्यालय बालमजुरांची मुक्ततेसाठी कटिबद्ध आहे.'' नितीन कवले, सहायक बालकामगार आयुक्त, अहमदनगर.
कोठे काम करतात बालमजूर अनेकदा वाढपी किंवा वीटभट्टीवर मजुरी करतात. ऊस तोडणी, सिंचन, जमीन मशागत, पेरणी, लागवड, आंतरपीक, मळणी, फवारणी आदी कामांमुळेही स्थलांतर करतात. बालकांसाठी काम करणाऱ्या संस्था, पोलिसांचा मानवी तस्करी विराेधी विभाग व कामगार विभागाकडून केलेल्या शोधमोहिमेत मात्र अत्यल्प बालमजूर आढळले आहेत. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणीही बालके कमी दरात काम करताना दिसतात.
प्रशासनाला येथे माहिती कळवावी जिल्ह्यात १४ जून रोजी केलेल्या कारवाईत ९ बालकामगार आढळले होते. जिल्ह्यात बालकामगार आढळले, तर नागरिकांनी तत्काळ चाईल्डलाईन या स्वयंसेवी संस्थेच्या १०९८ या टोलफ्री क्रमांकावर, नजिकच्या पोलिस ठाण्यात, तसेच सहायक बालकामगार आयुक्त कार्यालयात माहिती कळवावी, संबंधित बालकामगाराची मुक्तता केली जाईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.