आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेचा पहिला दिवस:आईचं बोट धरून आले अन् शिक्षकांकडून अनोखे स्वागत पाहून चिमुकले भारावले ; विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

अहमदनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेली दोन अडीच वर्षे कपाटात विसावलेला गणवेश अंगावर चढवला.. तर शाळेच्या विश्वात पहिल्यांदाच पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांनी नव्याकोऱ्या गणवेशाची नवलाई अनुभवली. पुस्तकांचा खास गंध श्वासात भरून घेतला.. सुटीत मामांच्या गावाला गेलेल्यांनी दप्तर, डबा यांच्याशी नव्याने मैत्री केली.. कुणी मित्रांसोबत, कुणी मोठ्या भावासोबत, कुणी बाबांच्या स्कूटरवरून, तर कुणी आईचं बोट धरून शाळेत आले. अन् तेथे जल्लोषात झालेले स्वागत पाहून चिमुकले विद्यार्थी भारावले. हे चित्र होते बुधवारी जिल्हाभरात मोठ्या जल्लोषात साजऱ्या झालेल्या शाळा प्रवेशाचे, अर्थात शाळेच्या पहिल्या दिवसाचे.

पिंपरणे पिंपरणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत फुगे, फुलांच्या माळा, रांगोळ्या काढल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सरपंच शैला साळवे, उपसरपंच अजित देशमुख, कृष्णा काळे, कृष्णा राहिंज, मंजाबापू साळवे, संजय बागुल, मुख्याध्यापक संजय बोर्से, मंदाकिनी मोदड, प्रतिभा दुर्गुडे, सुनिता अस्वले, मंदादेवी गवारी, प्रदिप बागुल, अनिता मुरडनर, आदींसह पालक, स्कूल कमिटी सदस्य उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. बालवाडीतल नव्याने दाखल झालेल्या पहिलीच्या मुलांच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती होती. तर थोड्या मोठ्या किंवा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मात्र खुप दिवसांनी भेटलेल्या मित्रमैत्रिणींना कडकडून मिठी मारत शाळेचा पहिला दिवस मजेशीर घालवला. गावातील सर्व शाळांचा परिसर गजबजलेल्या वातावरणात हरवून गेला होता. शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे बुधवारी बहुतांशी शाळेत पालक आपल्या मुलांना पोहोचवायला आले होते. विशेषत: नव्याने प्रवेश घेतलेल्या शाळेत मुलं पालकांसोबतच आली. तर पुढच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलांची फौज कोणी मित्रांबरोबर तर कोणी वडिलांसोबत, भावाबरोबर आली. प. पु. गगनगिरी विद्यालय, यासह गावात बालवाडी, जिल्हा परिषद या सर्व शाळांच्या परिसरातील रस्ते गर्दीने फुलले. शाळेच्या पहिल्या दिवसाची विद्यार्थ्यांना जितकी उत्सुकता होती. तितकीच मुलांबरोबर आलेल्या पालकांनाही होती. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदही दिसत होता. पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांना पुस्तके, पेन्सिल, दप्तरचे वाटप करण्यात आले. पालक गोकुळ काळे व उत्तम राहिंज यांनी सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्नाचे जेवण दिले. आईला सोडून शाळेत जाताना छोट्या मुलांनी रडायला सुरूवात केल्यामुळे अशा मुलांना शांत करताना शिक्षकांचीही कसोटी लागत होती. डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयात जल्लोषात स्वागत कोपरगाव शहर | डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यामंदिर कोपरगाव येथे शाळा प्रवेशोत्सव चैतन्यमय, आनंददायी वातावरणात उत्साहात साजरा झाला. शाळेतर्फे मुलींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मुलींना शाळेची गोडी लागावी, भीती वाटू नये, यासाठी शाळेचा परिसर हा शिक्षकांनी विविध रंगीबेरंगी फुले, फुगे व रांगोळ्या काढून आकर्षक पद्धतीने सजवला होता. शालेय आवारात सेल्फी पॉइन्ट विद्यार्थीनी व पालकांचे आकर्षण केंद्र बनले होते. विद्यार्थिनींच्या स्वागत प्रसंगी विद्यालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य ॲड. वसंत कपिले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युसुफ रंगरेज, शाळा व्यवस्थापन व विकास समिती सदस्या प्रतिभा शिलेदार, माधवी वाकचौरे, बिपीन गायकवाड, प्राचार्या मंजुषा सुरवसे, पर्यवेक्षक अरुण गोऱ्हे, आदींच्या हस्ते नवप्रवेशित विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. प्राचार्या सुरवसे यांनी विद्यालयातील उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्यासाठी उपाययोजना, सेतू अभ्यासक्रम, इतर शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमबजावणी करण्याबाबत सर्व घटकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रतिभा शिलेदार यांनी नवीन पाठ्यपुस्तके सुंदर असून, त्यांचे वाचन करताना विद्यार्थिनी नक्कीच त्यात रममाण होतील, असे मत व्यक्त केले. वसंत कपिले यांनी विद्यार्थिनी आनंददायी शिक्षण घेऊन यशाची उत्तुंग भरारी घेऊन विद्यालयाचे व आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करतील, अशी अपेक्षाा व्यक्त केली. सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या गौरवार्थ कर्मवीर पारितोषिक विद्यालयास प्रदान करून गौरव केला, त्याबद्दल प्राचार्या व सर्व शिक्षक शिक्षिकेतर सेवकवृंदांचा पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी स्वामिनी विजय आवारे, जान्हवी शैलेश पाळेकर व कस्तुरी विजय सोनवणे या तीन विद्यार्थिनींना रोख बक्षीस देण्यात आली. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत राहुरी | पहिल्या दिवशी शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांकडुन गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष शाळा भरण्यास अनियमितता आली होती. यंदा शैक्षणिक वर्षात कोरोनाचे संकट दूर झाल्याने राहुरी तालुक्यातील बहुतांशी शाळांची घंटा वाजली आहे. बुधवारी पहिल्या दिवशी राहुरीच्या बालविद्यामंदिर व विद्यामंदिर मधील काही विद्यार्थी शाळेत हजर झाले. विद्यामंदिर प्रशालेत पहिल्या दिवशी विद्यार्थी उपस्थित कमी असली तरी शाळेची सुरवात शिक्षकांच्या व संस्था चालकाच्या दृष्टीने महत्वाची ठरली. शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या हातात विविध शालेय घोष वाक्याचे फलक देऊन राहुरी शहरातून फेरी काढण्यात आली. फेरी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वार जवळ येताच गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पहिला दिवस असल्याने शाळेच्या प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढुन रंगीबेरंगी फुग्यांनी प्रवेशद्वार सजवले. यावेळी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक कैलास अनाप, बालविद्यामंदिरचे मुख्याध्यापक गुलाब मोरे, संस्थाचालक बिहाणी व इतर शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन धनंजय गिरी यांनी तर आभार संदीप रासकर यांनी मानले. अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत संगमनेर | कोरोना संकटानंतर राज्यातील शाळा दोन वर्षांनी आनंदात व उत्साहात बुधवारी सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलमध्ये संस्थेच्या विश्वस्त शरयु देशमुख यांनी चिमुकल्यांचे गुलाब पुष्प व खाऊ देऊन स्वागत केले. या अनोख्या स्वागताने बालगोपाळ व पालक भारावून गेले. विद्यार्थ्यांच्या आगमनाने तालुक्यातील सर्वच शाळा गजबजून गेल्या होत्या. प्राचार्य अंजली कन्नावार, जे. बी. शेट्टी, स्मिता कासार, निता खर्डे आदींसह शिक्षक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम होत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे संस्था राज्यात अग्रगण्य ठरली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी अमृतवाहिनी इंटरनॅशनल, निडो व मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने स्वागत झाल्याने भेटलेले मित्र, मैत्रिणी, नवे वर्ग, शिक्षक व शाळेचा परिसर पाहून बालगोपाल भारावून गेले. शाळा सुरू झाल्याने पुन्हा गजबजलेले मैदाने, विद्यार्थ्यांची धावपळ, नवीन मुलांचे रडगाणे, पालकांची हुरहुर हे वातावरण मनाला प्रसन्न करणारे होते. देशमुख म्हणाल्या, कोरोनाचा दोन वर्षाचा कालखंड सर्वांसाठी कठीण होता. यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू होते. मुलांना जे शिक्षण प्रत्यक्ष शाळेत मिळते ते ऑनलाईन शिक्षण देण्यात अडचण झाल्याने शिक्षणाचा दर्जाही खालावला. गजबजलेल्या शाळा, प्रसन्न व आनंदी मुले हे क्षण दुरावले होते. मात्र पुन्हा एकदा सर्व नव्याने सुरू झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. मुलांच्या आगमनांनी गजबजल्या शाळा सोनई | दोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा १५ जूनला भरल्याच नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा भरणार, शाळांची मैदाने व परिसर विद्यार्थ्यांच्या गर्दीने गजबजणार हे चित्र नेहमी पाहण्यास मिळत असे. परंतु कोरोनामुळे २ वर्ष शाळांचे कामकाज घरून सुरू होते. कोरोना निर्बंधामुळे विद्यार्थ्यांना मैदानावर खेळत सवंगड्याशी संवाद साधता आला नाही. यावर्षी कोरोनाचे सर्व निर्बंध उठल्याने बुधवारी सर्व शाळा सुरू होऊन शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेच्या मैदानात विद्यार्थी खेळत, हसत, बागडत असल्याचे उर्जादायी चित्र सोनई, लोहोगाव, मोरयाचिंचोरे, घोडेगाव, मुळा कारखाना परिसरातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये दिसले. शाळेच्या वतीने मोफत पुस्तके, गणवेश, गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांशिवाय शाळा हे समीकरण अपूर्ण आहे. हसत, खेळत तणावरहित गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना नियमित शाळेत यावे यासाठी विशेष काम करू, अशी ग्वाही शिंगवे तुकाई येथील शिक्षक सुनील दानवे यांनी व्यक्त केली. अगस्ति विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत अकोले | श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीच्या अकोले येथील अगस्ति विद्यालयामध्ये पहिल्याच दिवशी अतिशय उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. संगीत शिक्षक मंगेश खांबेकर यांनी गितमंचासह स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापक शिवाजी धुमाळ होते. व्यासपीठावर शालेय समितीचे सदस्य दत्तात्रय ताजने, उपमुख्याध्यापिक सुजल गात, पर्यवेक्षक मंगेश खांबेकर, संजय शिंदे, बाजीराव देशमुख, प्रकाश डोळस, प्रकाश आरोटे, संजय पवार उपस्थित होते. विद्येचे आराध्य दैवत सरस्वती व गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी सर यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक विद्यालयाचे शिक्षक संजय पवार सर यांनी केले. शालेय समितीच्या सदस्यांचे अगस्ति परिवारातर्फे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फलक लेखन व रांगोळी रेखाटन केले होते. आकर्षक सजावट केली होती. यशवंत गाडे विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा नगर | फकिरवाडा ( मुकुंदनगर ) येथील यशंवतराव गाडे माध्यमिक विद्यालयात बुधवारी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळेत पहिल्याच दिवशी आलेल्या सर्व मुलांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच सर्व मुलांना मोफत पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे खजिनदार संजय गाडे, उपाध्यक्ष एम. पी. कचरे, नगरसेवक योगीराज गाडे, मुख्याध्यापिका डॉ.निशात शेख, पालक मोठया संख्येने उपस्थित होते. महाराणी ताराबाई विद्यालयात कन्यांचे झांजपथकाने स्वागत नगर | केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात बुधवारी प्रवेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत आलेल्या कन्यांचे झांज पथकाच्या निनादात स्वागत करण्यात आले. यावेळी मुलींना मोफत पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. मुलींच्या स्वागतासाठी रंगीबेरंगी मोहक रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे बाळासाहेब लहाकर, संस्थेचे सचिव बबनराव कोतकर, संचालक प्रल्हाद साठे, प्राचार्या वासंती धुमाळ व शिक्षक, पालक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...