आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामीन अर्जावर युक्तिवाद:चोळके व सागर भिंगारदिवेच्या जामिनाचा निर्णय प्रतीक्षेत; रेखा जरे हत्याकांड आरोप निश्चितीसाठी १६ ला सुनावणी

नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेखा जरे यांच्या हत्याकांडातील १२ आरोपींविरुद्धची आरोप निश्‍चितीची प्रक्रिया १६ सप्टेंबरला होणार आहे. गणेशोत्सव बंदोबस्तामुळे या प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ ज. बोठेसह अन्य आरोपींना मंगळवारी न्यायालयात आणता आले नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी आदित्य चोळके व सागर भिंगारदिवे यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाले असून, त्यावरील निकाल प्रतिक्षेत आहे.

३० नोव्हेंबर २०२० रोजी जातेगाव घाटात रेखा जरे यांचा निर्घृण खून करण्यात आला. पोलिसांनी या खून प्रकरणात सुरुवातीच्या दोनच दिवसात ज्ञानेश्‍वर उर्फगुडु शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) या ५ आरोपींना अटक केली. त्यानंतर मुख्य सूत्रधार बोठे याला हैदराबाद येथे पकडले. तसेच हैदराबाद येथे बोठेला लपण्यास मदत करणार्‍या जनार्दन अकुला चंद्रप्पा (रा. रामनगर, हैदराबाद), पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा. हैदराबाद),राजशेखर अजय चाकाली (वय २५, रा. आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (वय ३०, रा.आंध्रप्रदेश) व अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ (वय ५२, रा. आंध्र प्रदेश) यांचा व नगरमधील महेश वसंतराव तनपुरे यांचाही आरोपींमध्ये समावेश केला आहे.

यातील महिला आरोपी पी. अनंतलक्ष्मी सुब्बाचारी पसार आहे. या प्रकरणात १२ आरोपी असून, यापैकी ११ जणांना पोलिसांनी पकडले आहे. या सर्वांविरुद्ध आरोप निश्‍चितीची प्रक्रिया मंगळवारी होणार होती. मात्र, आरोपींना पोलिसांनी आणले नसल्याने आता १६ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील जनार्दन अकुला चंद्रप्पा, राजशेखर अजयचाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ व नगरमधील महेश तनपुरे या पाच जणांनी मंगळवारी न्यायालयात हजेरी लावली.भिंगारदिवे व चोळके यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले असून, निकाल प्रतीक्षेत आहे.

बातम्या आणखी आहेत...