आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लढा:बोल्हेगावातील नागरिकांचा नऊ दिवसांपासून मुक्काम; मंजूर रस्त्याच्या सुमारे अडीच एकर जागेचा वाद

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोल्हेगाव येथील मंजूर लेआउट मधील रस्त्याच्या जागेवर ताबा मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेथील प्लॉट धारकांच्या घरासमोरील अतिक्रमणे काढण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी मागील नऊ दिवसांपासून महापालिकेत मुक्काम ठोकला आहे. मंगळवारी मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलकांनी दोन दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या नागरिकांनी दिला आहे.

बिगर शेती झालेल्या जमिनीवर लेआऊट मंजूर करून प्लॉट विकण्यात आले होते. या लेआउट मध्ये रस्त्याचे क्षेत्र ३५ मीटर दर्शविण्यात आले आहे. सातबारा उताऱ्यावर रोडच्या ९ हजार २१५ चौरस मीटर क्षेत्राची नोंद करण्यात आली आहे. मात्र नवीन उतारा करत असताना शेत जमिनीचा जुना उतारा बंद न केल्यामुळे त्याचा आधार घेऊन तत्कालीन शेतजमिनीच्या मालकांनी व त्यांच्या वारसांनी या रस्त्याच्या जागेवर दावा ठोकला आहे. सदरचा उतारा बंद करणे आवश्यक असल्याचा तेथील मंडळ अधिकाऱ्यांनी अहवाल यापूर्वीच दिलेला आहे. मात्र मनपाने ६० मीटर रुंद असलेला रस्ता ३० मीटर केला असून उर्वरित क्षेत्र पुन्हा मूळ मालकाला मिळावे, असा दावा शेतजमीन मालकांनी केलेला आहे.

या विरोधात तेथील प्लॉट धारकांनी आक्षेप घेतला आहे. संबंधितांकडून प्लॉट धारकांच्या घरासमोर चार फूट खोल चारी खोदल्याने प्लॉट धारक आक्रमक झाले असून, त्यांनी नऊ दिवसांपासून महापालिकेत मुक्काम ठोकला आहे. या रस्त्याच्या जागेवर ताबा मारण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यावर अतिक्रमणे करण्यात आली आहेत. त्यामुळे सदरची अतिक्रमणे तात्काळ काढावीत, अशी मागणी या नागरिकांनी केलेली आहे.

महापालिकेकडून अद्यापही कारवाई न झाल्याने आंदोलक अद्यापही आंदोलनावर ठाम आहेत. मंगळवारी मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी आंदोलकांशी पुन्हा चर्चा केली. दोन दिवसात याबाबत पुन्हा चर्चा करण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यामुळे दोन दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला असल्याची माहिती अशोक भंडारी यांनी दिली. दरम्यान, गेल्या नऊ दिवसांपासून आंदोलक मनपात तळ ठोकून असल्याने व लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांकडून याची योग्य दखल घेतली जात नसल्याने शहरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...