आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअ व ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे २० डिसेेंबरनंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. परंतु, शहर सहकारी बँकेचा एका बिनविरोध उमेदवाराचे निधन झाल्याने, तसा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सहकार निवडणूक आयोगाकडे पुढील मार्गदर्शनासाठी पाठवला जाणार आहे. त्यामुळे शहर बँकेची निवडणूक प्रक्रिया पंधरा ते वीस दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील ७ हजार ७५१ सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यात अ वर्गातील ३८ व ब वर्गातील १ हजार १७९ संस्थांचा समावेश होता. राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही याच कालावधीत होत असल्याने, अ व ब वर्गातील निवडणुका २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यात ब वर्गातील शहर सहकारी बँकेचाही समावेश आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून समजलेल्या माहितीनुसार, १५ जागांपैकी २ जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यात राखीव गटातील सुनील फळे यांचे नुकतेच निधन झाले होते.
यापार्श्वभूमीवर निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत राज्य सहकार निवडणूक आयोगाकडे पुढील निर्णयासाठी प्रस्ताव पाठवला जाणार आहे. जर आयोगाने बँकेच्या सर्वच मतदार संघासाठी अल्पमुदतीचा फेर कार्यक्रम जाहीर केला, तर रिंगणातील उमेदवार जैसे थे राहून, नव्याने अर्ज दाखल होऊ शकतील, व त्यांनाच अर्ज माघारीची मुदत दिली जाईल. असे झाले, तर तूर्तास कोणतीच जागा बिनविरोध म्हणता येणार नाही. या प्रक्रियेला पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असून, ही निवडणूक २० डिसेंबरनंतरही १५ ते २० दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
आयोगाच्या निर्देशांवरच कार्यवाही
शहर सहकारी बँक निवडणुकीतील उमेदवाराचे निधन झाले. याबाबत राज्य सहकार निवडणूक आयोगाकडे शुक्रवारी (१६ डिसेंबर) प्रस्ताव दिला जाणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.-गणेश पुरी, जिल्हा उपनिबंधक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.