आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकार्पण:ग्रीन फिल्ड मुळे नगर होणार लॉजिस्टिक कॅपिटल; केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास

नगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगरचा उड्डाणपूल हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने अहमदनगर देशाच्या नकाशावर येणार आहे. उत्तर- दक्षिण भारताला जोडणारा मुंबई ते दिल्ली हा नवा राष्ट्रीय ग्रीन फिल्ड महामार्ग सुरत -नाशिक -नगर -सोलापूर अक्कलकोटहून चेन्नईला जाणार आहे. भारतमाला योजनेतून त्याला मंजुरी दिली आहे. १६०० किलोमीटरचा हा महामार्ग आहे. सध्या ३० ते ३२ तास जाण्यासाठी लागतात. नवा राष्ट्रीय महामार्ग हा १२९० किमीचा आहे. ८० हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. पुढच्या वेळी या प्रकल्पाच्या भूमिपुजनासाठी मी नगरला नक्की येईल.

या महामार्गामुळे सोलापूर कोल्हापूरहून मुंबई- पुण्यात जाणारी उत्तर- दक्षिण भारतातील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान,गुजरात येथील वाहतूक आता नगरहून जाईल, त्यामुळे नगर लॉजिस्टिक कॅपिटल बनल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केला. दरम्यान, ‘दिव्य मराठी’ने शनिवारी सुप्याजवळ ५०० कोटींच्या लॉजिस्टिक पार्कसाठी शंभर एकर जागेचा शोध सुरू हे वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर मंत्री गडकरी यांनी घोषणा करून शिक्कामोर्तब केले.

अहमदनगर शहरातील तीन किलोमीटर अंतराच्या उड्डाणपुलाचे डिजिटल उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले .त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ.सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, महापौर रोहिणी शेंडगे,आमदार राम शिंदे, संग्राम जगताप, बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, उपस्थित होते.

औरंगाबाद -पुणे रस्त्याबाबत नाराजी
सध्याचा औरंगाबाद- पुणे रस्ता फार खराब झाला आहे. याबाबत मंत्री गडकरींनी नाराजी व्यक्त करतानाच या रस्त्या दरम्यान असलेल्या वाघोली व अन्य परिसरात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे ५६ किमीचा १८ लेनचा हा रस्ता केला जाणार आहे. पुणे- बेंगलोरचे काम सुरू असून, ४२ हजार कोटीचे हे काम आहे.

स्व. गांधी यांनी घातला उड्डाणपुलाचा मूळ पाया
ऐतिहासिक शहरातील उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा हा सोहळा सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. डॉ.सुजय विखे खासदार झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळाली. स्व. खासदार दिलीप गांधी यांनी या उड्डाणपुलाचा मूळ पाया घातला त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, असे पालकमंत्री विखे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या विकास चक्राला पुन्हा गती प्राप्त होईल
जिल्ह्यात वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १७ हजार कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात विविध कामे खोळंबली होती. महाराष्ट्रातील विकास चक्राला आता गती प्राप्त होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ऑनलाइन उड्डाणपुलाच्या पुलाच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केला. या उड्डाणपुलामुळे अपघातांची संख्या कमी होईल, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल. असे फडणवीस यांनी सांगितले.

लॉजिस्टिक पार्क साठी विखेंनी पाठपुरावा करावा
मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या महामार्गाच्या बाजूला लॉजिस्टिक पार्क ,इंडस्ट्रीज पार्क, स्मार्ट व्हिलेज उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून पाठपुरावा करावा. जेणेकरून रोजगार निर्माण होऊन या भागातील विकासाला चालना मिळेल. असे गडकरी यांनी सांगून पुणे -औरंगाबाद हा २६८ किलोमीटरचा सहा पदरी महामार्ग असून ११ हजार कोटीचा हा प्रकल्प आहे. पुणे- औरंगाबाद एक्सप्रेसवेमुळे पुण्याहून औरंगाबादला अडीच तासात जाता येणार आहे. पुढे जालना येथून समृद्धीला हा महामार्ग जोडला जाईल तिथून नागपूर ते पुणे साडेसहा तासांत जाता येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...