आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी सुरू:पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये ठाण्यातच हाणामारी

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचऱ्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली धुसफूस बुधवारी रात्री बाहेर पडली. पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षातच दोघांमध्ये चांगलाच राडा झाला. ही घटना पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली आहे. हप्तेखोरीतून हा प्रकार झाल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे. दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे.

भिंगार शहर, बुऱ्हाणनगर, दरेवाडी आदी भागाची जबाबदारी असलेले भिंगार कॅम्प पोलिस ठाणे नेहमीच चर्चेत असते. आता हद्दीतील हप्तेखोरी चर्चेचा विषय ठरली आहे. याच कारणातून पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये नेहमी कुरघोडीचे राजकारण सुरू असते. पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या मर्जीतील एका अंमलदारावर अनेकांचा डोळा आहे. त्याची हप्तेखोरी उघड करण्यासाठी प्रयत्न इतरांकडून सुरू आहे. त्या अंमलदाराला इतरांकडून टार्गेट केले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. याला बुधवारी रात्री वेगळे वळण मिळाले.

हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यांना अटक करण्यासाठी पथक रवाना करण्याच्या सूचना प्रभारी अधिकार्‍यांनी दिल्या. या पथकामध्ये जाणार्‍या प्रभारी अधिकाऱ्यांच्या मर्जीतील अंमलदाराला दुसऱ्या एका अंमलदाराकडून अश्‍लिल भाषेचा वापर झाला. यातून हा वाद झाला आणि दोघे भिडले. तेथे उपस्थित असलेल्या अधिकारी, अंमलदारांनी मध्यस्थी करत हा वाद मिटविला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची खदखद हाणामारीतून बाहेर आल्याने याची चर्चा सर्वत्र झाली आहे. घटना घडली त्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून स्टेशन डायरीमध्ये नोंद केली आहे. हा प्रकार कशातून घडला याची चौकशी सुरू केली असून चौकशीअंती अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार असल्याचे सपोनि देशमुख यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...