आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:शहराजवळच्या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनप्रेमींची स्वच्छता; ट्रेककॅम्प संस्थेचा पुढाकार, मोहिमेत 400 जणांचा सहभाग

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्गाप्रती प्रत्येकाने कृतज्ञ राहायला हवे. त्यासाठी सभोवतालच्या निसर्गाची स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, या भावनेतून ट्रेककॅम्प संस्थेने ट्रेकिंग करतानाच डोंगरगण येथील आनंददरीत स्वच्छता मोहिम राबवली. सुमारे ४०० ट्रेकर्सनी आनंददरीतील प्लॅस्टीक, काचेचा कचरा गोळा करून सामाजिक भान जपले.

निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाला आल्यानंतर काहीजण प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या व कचरा तेथेच टाकून जातात. हा कचरा निसर्गाला घातक ठरत असल्यामुळे ट्रेककॅम्पचे संस्थापक विशाल लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन ‘प्लॉगिंग ड्राईव्ह’ (स्वच्छता मोहीम) राबवण्याचा निर्णय घेतला.

निसर्गात भटकंती करत असताना डोळ्यासमोर दिसेल तो प्लॅस्टिकचा कचरा, बाटल्या गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे ठरले. या निर्णयाला ग्रुपच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ट्रेककॅम्पच्या आनंददरी ट्रेकमध्ये ४०० पेक्षा अधिक अबालवृद्ध ट्रेकर्स सहभागी झाले होते.

या प्रत्येक सदस्याला ट्रेककॅम्पच्या वतीने हातमोजे देण्यात आले. वांबोरी घाटाच्या पायथ्यापासून या मोहिमेला सुरुवात झाली. डोंगरगणच्या आनंददरीतून फिरत असताना अनेक प्लॅस्टिकच्या पिशव्या, थर्माकोलच्या डिशेस, पाणी-दारूच्या बाटल्या ट्रेकर्सनी गोळा केल्या. कचऱ्याच्या सुमारे ५० बॅग व दारूच्या ५० किलो बाटल्या गोळा झाल्या. त्या सर्वांची नगरमध्ये आणून ट्रेकर्सनी विल्हेवाट लावली. निसर्गात मनमुराद भटकंती करत असतानाच स्वच्छता मोहीम राबविल्याचा आनंद प्रत्येक ट्रेकर्सच्या चेहऱ्यावर दिसत होता. नगरजवळ दुर्लक्षित निसर्गरम्य ठिकाणांचा शोध घेऊन तेथे ट्रेकिंगचे आयोजन करण्यासाठी ‘साद गर्भगिरीला’ हा उपक्रम ४ वर्षांपूर्वी ट्रेकॅम्पचे संस्थापक विशाल लाहोटी यांनी सुरू केला. त्यास नगरकरांनी प्रतिसाद दिला.

स्वच्छता ठेवणे सर्वांची जबाबदारी
निसर्ग स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. पर्यटनाला जाताना तेथे कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. वापर झाल्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या गोळा करण्यासाठी एक स्वतंत्र गोणी अथवा पिशवी सोबत न्यावी. पर्यावरणाप्रती प्रत्येकाने सजग राहावे.''
विशाल लाहोटी, संस्थापक, ट्रेककॅम्प.

बातम्या आणखी आहेत...