आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील क्षेत्रिय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाने शहरातील बुजवलेल्या ओढ्या-नाल्यांबाबत झालेल्या तक्रारीची दखल घेतली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना या तक्रारीची प्रत पाठवून याबाबत येत्या ५ जानेवारीला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आढावा घेणार असल्याचे कळवले आहे. दरम्यान, महापालिकेने तीन दिवसांपूर्वीच बैठक घेऊन कारवाईबाबत माहिती दिली होती.
नागरिक कृती मंचाचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी शहरातील बुजवलेल्या ओढ्या-नाल्यांतील अतिक्रमणे हटवून त्यांचे प्रवाह पूर्वीसारखे मोकळे करण्याची मागणी केली आहे. मागील तीन वर्षांपासून त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी तीन महिन्यांपूर्वी आढावा घेतला व ९० दिवसात संबंधित तक्रारींचे निराकरण करण्याचे आदेश मनपाला दिले होते. मात्र, या कालावधीतही मनपाने काही केले नसल्याचा दावा करत चंगेडे यांनी नगरच्या सीएमओ कक्षात तक्रार केली.
दरम्यान, महापालिकेने शहरात असलेल्या ४१ ओढे व नाल्यांवरील अतिक्रमणांवर व बुजवलेल्या ओढ्या नाल्यांचे सर्वेक्षण केले आहे. एकूण ९४ किमी लांबीपैकी ८ किमी लांबीचे ओढे-नाले पाईप टाकून बुजविण्यात आले आहेत. त्यातील बांधकाम झालेले नसलेल्या जागांवर नव्याने बांधकाम परवानगी देऊ नये, अशा सूचना आयुक्तांनी नगररचना विभागाला दिले आहेत.
तसेच सदर लेआउट रद्द करून नव्याने सुधारित लेआउट करण्यासंदर्भात संबंधितांना नोटिसा बजावणे, नाल्याची रुंदी निश्चित करण्यासाठी प्रक्रिया सुरू करणे व ओढे व नाल्यांवरील कामकाजा संदर्भात नगररचना विभागात निवृत्त अधिकाऱ्यांची समिती स्थापन करणे, आदी निर्णय मनपाकडून घेण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.