आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी:संपर्क प्रमुखांच्या बैठकीत तक्रारींचा पाऊस

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतील ३२ कोटी रुपयांच्या जागा खरेदी प्रकरणी पक्षाची बदनामी होत आहे. महापालिकेत सत्ता असूनही आमची कामे होत नाहीत. मनपा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारच चालवतात. शहरप्रमुखही विश्वासात घेत नाहीत, अशा तक्रारी करत पदाधिकारी बदलण्याची मागणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली. बैठकीत महापौर व शहरप्रमुखांविरूध्द तक्रारी करत त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला.

संपर्कप्रमुख आमदार शिंदे यांनी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी जिल्ह्याच्या दक्षिण भागातील पदाधिकारी, शहरातील पदाधिकारी व महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेतली. जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व रावसाहेब खेवरे, महापौर रोहिणी शेंडगे, शहर प्रमुख संभाजी कदम, युवासेनेचे सहसचिव विक्रम राठोड, संजय शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, संदेश कार्ले, अशोक गायकवाड, आशा निंबाळकर, स्मिता आष्टेकर यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

शिवसेनेचा महापौर असूनही मनपामध्ये कामे होत नाहीत. शहरात रस्ते व्यवस्थित नाहीत. नियमित पाणी मिळत नसेल तर पक्षाची सत्ता असूनही त्याविरोधात आंदोलन करावे लागेल. सावेडी उपनगरात स्मशानभूमी व दफनभूमीसाठी ३२ कोटी रुपयांची जागा खरेदीचा घाट घातला जात आहे. त्यामध्ये पक्षावर शिंतोडे उडवले जात आहेत, पक्षाबद्दल संशय घेतला जात आहेत.

निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलावे. बंद खोलीत भाजप खासदार व राष्ट्रवादीच्या आमदारांबद्दल पक्षाचे पदाधिकारी बोलतात, परंतु जाहीरपणे कोणी त्यांच्या विरोधात वक्तव्य करत नाहीत, असेही म्हणणे आमदार शिंदे यांच्याकडे मांडण्यात आले. दरम्यान, कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे, त्यांचा अपमान होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना आमदार शिंदे यांनी दिल्या.

युवा सेनेकडूनही झाल्या तक्रारी
युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यानी आमदार शिंदे यांच्याकडे तक्रारी केल्या. शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर यांनी जिल्हाप्रमुख पक्षाच्या कार्यक्रमात खो घालण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार केली. तर जिल्हाप्रमुख रवी वाकळे यांनी प्रभागात विरोधी उमेदवारासमवेत कार्यक्रम घेतला जातो, मात्र आपल्याला स्थान दिले जात नाही, याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले.

बातम्या आणखी आहेत...