आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:राहाता तालुक्यातील ‘बीएलओ’च्या संकल्पना राज्यासाठी मार्गदर्शक; मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे गौरवोद्गार

शिर्डी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) ‘कुटुंब रजिस्ट्रर’ सारख्या राबवलेल्या संकल्पना राज्यातील बीएलओंसाठी मार्गदर्शक आहेत. असे गौरवोद्गार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले. ज्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या भागाचे आधार प्रमाणीकरण शंभर टक्के पूर्ण केले आहे. अशा ‘बीएलओ’चा मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांच्या हस्ते ‘विशेष प्रशस्तीपत्र’ देऊन शिर्डी येथे गौरव करण्यात आला.

त्यावेळी त्यांनी राहाता तालुक्यातील ‘बीएलओ’शी सहज संवाद साधला. यावेळी अहमदनगरचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, सुधाकर ओहोळ उपस्थित होते. आधार प्रमाणीकरण पूर्ण करणाऱ्या बाळासाहेब नाईकवाडे, भुसाळ नानासाहेब, सोमनाथ येलमामे व बाळू सोसे या बीएलओंचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

देशपांडे म्हणाले, आता भारत निवडणूक आयोगाकडून वर्षातून ४ वेळा म्हणजेच १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.यावेळी देशपांडे यांनी राहाता येथील बीएलओ यांच्या आधार प्रमाणीकरण कामाच्या संकल्पना जाणून घेतल्या. यावेळी दत्ता गायकवाड, संदीप गाडे, विजय फटांगरे, ज्ञानदेव जवक, देविदास बनकर, राजूभाई सय्यद व निखिल हातांगळे यांनी आपले अनुभव सांगितले. ‘गरूडा’ ॲप मध्ये आडनाव यावे, अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे मतदार यादी यावी, मतदार यादी मधील नावात दुरूस्ती करता यावी, मतदारांना ओळखपत्र ऑनलाईन डाऊनलोड करता यावे. अशा नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणे शक्य आहे, असे बीएलओनी यावेळी सांगितले.

त्यावर राहाता तालुक्यातील बीएलओनी सूचवलेल्या संकल्पना उल्लेखनीय व वेगळ्या आहेत. या सूचनांचा ‍निवडणूक कार्यालयास उपयोग होणार असून या सूचनांचा निश्चित विचार केला जाईल, असे ही मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आवश्यक
मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम राज्यभर १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मतदार, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आवश्यक आहे. ‘बीएलओ’च्या कामात मतदारांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...