आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘नाटा’च्या परीक्षेत विद्यार्थ्यांची सत्त्वपरीक्षा!:आर्किटेक्चर टेस्टच्या निमित्ताने नापास यंत्रणेची पटली खात्री, राज्यात भयावह चित्र; यंत्रणाच झाली हँग

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर येथील काेविड सेंटरचे संग्रहित छायाचित्र.
  • नगरमध्ये कोविड सेंटरशेजारीच बैठक व्यवस्था; कोरोनाबाबतच्या उपाययोजनांकडे कानाडोळा
  • राज्यातून 11 सेंटरवरून 20 हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा, अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी

आर्किटेक्ट (वास्तुरचना) अभ्यासक्रमासाठी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने शनिवारी राज्यभर नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (नाटा) ही प्रवेश परीक्षा घेण्यात आली. राज्यभरात गोंधळाच्या परिस्थितीत ही परीक्षा पार पडली. एकीकडे कोरोनाचा प्रकोप वाढत असतानाच निर्ढावलेल्या यंत्रणेच्या निर्लज्जपणाने किती कळस गाठला आहे याची प्रचितीच यादरम्यान पालक व विद्यार्थ्यांना आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता काही सेंटरवर ही परीक्षा गोंधळात पार पडली. अहमदनगरमध्ये तर चक्क कोविड सेंटर परिसरातच १२२ विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ही परीक्षा द्यावी लागली.

नगरपासून २० किलोमीटर अंतरावरील रायसोनी महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर आहे. जवळच संशयित रुग्णांचे स्वॅब घेतले जातात.एकीकडे शहरात कोरोना रुग्णांची संख्या २० हजारांवर गेली आहे, असे असताना कोविड सेंटर परिसरात ही परीक्षा घेण्यात आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. आश्चर्य म्हणजे प्रशासनाला परीक्षांबाबत आयोजकांनी कोणतीही कल्पना दिली नव्हती असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

काय आहे नाटा? :

नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर असा नाटाचा अर्थ आहे. काैन्सिल ऑफ आर्किटेक्चर या संस्थेमार्फत ही परीक्षा घेतली जाते. या प्रवेश परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांची निरीक्षण व विचार करण्याची क्षमता यावर भर दिला जातो. बारावी परीक्षेत ५०% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा देता येते.

२०० गुणांची चाचणी

२०० गुणांची परीक्षा झाली. १२५ गुण हे ड्रॉइंग विषयासाठी, तर ७५ गुण अॅप्टिट्यूड टेस्टसाठी होते. विशेष म्हणजे यंदा ज्या विद्यार्थ्यांना घरी राहून परीक्षा देणे शक्य होते अशा विद्यार्थ्यांची काही दिवसांपूर्वी मॉक टेस्ट घेण्यात आली होती. त्या विद्यार्थ्यांना आज प्रत्यक्ष घरी राहून परीक्षा देता आली, तर ज्या विद्यार्थ्यांना घरी राहून परीक्षा देणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.

राज्यातून ११ सेंटरवरून २० हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा,अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी

औरंगाबाद : संकेतस्थळच हँग

औरंगाबादमध्ये संकेतस्थळ हँग झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना पेपर देता आला नाही. याबाबत केंद्र समन्वयकांना विचारणा केली असता एनटीएला तक्रार करावी, असे सांगण्यात आल्याने पालक संतप्त झाले होते.

नागपूर : कोरोनाला आमंत्रण

शहरातील गोधनी रेल्वे येथील सेंट्रल इंडिया काॅलेज ऑफ लॉ परीक्षेत प्रचंड गोंधळ उडाला. यामुळे २० मिनिटे वाया गेली. अनेकांना उशिराने कॉम्प्युटर मिळाले. कोरोनापासून बचावासाठी केंद्रावर कोणतीही उपाययोजना नव्हती.

सोलापूर : तांत्रिक अडचणी

शहरात कीर्ती अकॅडमीला सेंटर म्हणून मान्यता होती. काही विद्यार्थ्यांनी घरूनही परीक्षा दिली. एकूण १०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अनेकांचे संगणक हँग झाल्याने विद्यार्थ्यांना वेळेत पेपर देता आले नाहीत.

नाशिक/जळगाव : सेंटरच नाही

नाशिकमध्ये बहुतांश मुलांनी आपल्या घरूनच आॅनलाइन परीक्षा दिली, तर जळगावमध्ये परीक्षेसाठी सेंटर नव्हते. यामुळे जळगावातील विद्यार्थ्यांना घरून ऑनलाइन किंवा नाशिक येथील सेंटरवर जाऊन परीक्षा द्यावी लागली.

या प्रकरणाची चौकशी करावी

नगरमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला असताना अशा परीक्षेचे आयोजन करणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणे हा गंभीर प्रकार आहे. याप्रकरणी प्रशासनाने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे. - अर्शद शेख, जिल्हा अध्यक्ष, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर