आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभ्रमावस्था:मास्कच्या उत्पादकांसमोर संभ्रम; पाच महिन्यांत उत्पादन 90 टक्क्यांनी घटले

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नगरच्या मास्कला अमेरिककेसह 68 देशांतून होती मागणी

“मास्क’ वापरण्यावरुन आरोग्यमंत्री व आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव यांच्यात मतभेद असल्याचे समोर आले असतानाच मास्क निर्मिती करणाऱ्या उत्पादकांसमोर आता मास्कचे उत्पादन वाढवायचे की? आहे तेच सुरू ठेवायचे यावरून संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. नगरमध्ये असलेल्या मास्क निर्मितीच्या कारखान्यातून गेल्यावर्षी भारतासह ६८ देशांना मास्क पुरवले जात होते. आता मात्र कोरोना संख्या घटल्याने भारतासह अन्य देशांतून मास्कला मागणी घटली आहे. गेल्यावर्षी याच नगरच्या या कारखान्यात दररोज १२ लाख मास्कची निर्मिती केली जात होती. आता मात्र केवळ दररोज दोन लाख मास्कची निर्मिती होत आहे. मास्कचे उत्पादन ९० टक्क्यांनी घटले आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी मास्क सक्ती नाही पण आवाहन असल्याचे सांगितले. तर राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी मास्क बंधनकारक असल्याचे सांगितल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. मास्कवरून संभ्रमावस्था निर्माण झाली असतानाच मास्क उत्पादन करणारे कारखानदार मास्कचे उत्पादन वाढवायचे की ? आहे तेवढेच ठेवायचे यावरून द्विधा मनस्थितीत आहेत. नगर शहरातील नागापूर औद्योगिक वसाहतीत मास्क निर्मितीचे दोन कारखाने आहेत. सर्वात मोठ्या कारखान्यात १२ मशिनरींद्वारे मास्कची निर्मिती होते. तर अन्य एका कारखान्यात एक मशीन आहे.

सर्वाधिक मशिनरी असणाऱ्या या कारखान्यातून गेल्यावर्षी दररोज १२ लाख मास्कची निर्मिती केली जात होती. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून या कारखान्यात दररोज केवळ २ लाख मास्कची निर्मिती होत आहे. पाच महिन्यात या कारखान्यातील मास्कचे उत्पादन ९० टक्क‍यांनी कमी झाले आहे. याच कारखान्यातून अमेरिका, लंडन, स्पेन, दुबईसह मास्कची निर्यात केली जात होती. आता मात्र या देशांतून मागणी अत्यंत कमी झाली आहे.

कारखान्यात ३२ लाख मास्क पडून
सध्या आमच्याकडे दररोज दोन लाख मास्कची निर्मिती केली जात आहे. वर्षभरापूर्वी दररोज आम्हाला १२ लाख मास्क तयार करावे लागत होते. भारतासह अन्य देशांना आम्ही मास्क पुरवायचो. जवळपास ९० टक्क्यांनी मास्कचे उत्पादन घटले आहे.''
सुनील कानवडे, संचालक, लाईफ सोर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.

केवळ वैद्यकीय क्षेत्रातूनच मागणी
सध्या “मास्क’ ला केवळ वैद्यकीय क्षेत्रातूनच मागणी आहे. कोरोनाच्या कालावधीत मोठ-मोठे उद्योग, हॉटेल व अन्य क्षेत्रातून मास्कला मोठ्या प्रमाणात मागणी होती.कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर व पॉझिटिव्ह रुग्णसंख्या घटल्यानंतर या क्षेत्रांबरोबरच सर्वसामान्यांकडून देखील मास्क मागणी कमी झाली आहे.

...तर मास्क निर्मिती वाढवावी लागणार
मुंबई व कानपूर आयआयटीने जून महिन्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. चौथी लाट आली तरी ती सौम्य असणार आहे. या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. आगामी काळात चौथ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर मास्क बंधनकारक केल्यास कारखाना उत्पादकांना मास्क निर्मिती वाढवावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...