आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवसंकल्प:भाजप-आरएसएससारखी हुकूमशाही काँग्रेसमध्ये नाही : एच. के. पाटील,  ‘एक व्यक्ती एक पद’ या नियमाप्रमाणे 51 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

शिर्डी | नवनाथ दिघेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिर्डीत पार पडलेल्या दोनदिवसीय नवसंकल्प कार्यशाळेत राजकीय, सामाजिक मुद्द्यांसह विविध मुद्द्यांचा सखोल ऊहापोह करण्यात आला. या शिबिरात सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची मते मांडली व त्यातून एक महत्त्वाचा दस्तऐवज तयार झाला आहे. हा दस्तऐवज जाहीरनाम्यासह विविध योजना राबवण्यासाठी उपयुक्त ठरेल. काँग्रेस पक्ष लोकशाहीला माननारा पक्ष असल्याने या शिबिरात सर्व पदाधिकाऱ्यांनी मोकळेपणाने व स्पष्टपणे मते मांडली व ती मते विचारात घेण्यात आली. अशा पद्धतीची लोकशाही भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे का, असा सवाल विचारत, ते फक्त आदेश देण्याचे काम करतात. काँग्रेस लोकशाहीच्या तत्त्वाने चालणारा पक्ष आहे, आमच्याकडे भाजप-आरएसएस सारखी हुकूमशाही नाही, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या दोनदिवसीय कार्यशाळेची सांगता शिर्डीतील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात झाली, यावेळी पाटील बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रदेश काँग्रेसच्या शिर्डी येथील दोनदिवसीय शिबिराची सांगता
मंथनातील सार, १०० दिवसांचा कार्यक्रम बनवावा लागेल

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, शिर्डी कार्यशाळेतील दोन दिवसांच्या मंथनातून जे सार निघाले आहे, त्याचे एक दिशादर्शक पुस्तक बनू शकते. आता त्याची अंमलबजाणी करू, त्यासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम बनवावा लागणार आहेत. त्यानंतर त्याचा उपयोग आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाला निश्चितच होईल. हे अधिवेशनदेखील काँग्रेससाठी लाभदायी व फलदायी ठरले, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

थोरातांच्या नियोजनाची काँग्रेसमध्ये जाेरदार चर्चा
काँग्रेसच्या राज्यस्तरीय शिबिराचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल राज्यभरातून आलेल्या काँग्रेस नेत्यांनी महसूमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कौतुक केले. अल्पावधीत शिबिराच्या यशस्वितेसाठी आ. सुधीर तांबे, सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुलेसह तीनशे कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

उदयपूर घोषणापत्राची अंमलबजावणी : पटोले उदयपूर घोषणापत्राची अमंलबजावणी करण्यास आम्ही सुरुवात केली असून ‘एक व्यक्ती एक पद’ नियमानुसार या शिबिरात ५१ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. ही प्रक्रिया पुढेही चालूच राहील. सहा विभागांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे कामही केले जाणार आहे. सरकार व पक्ष संघटना यांच्यात समन्वय साधणे, संघटन वाढवणे यावरही विस्तृत चर्चा झाली आहे. केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, त्याचा निषेधही या शिबिरात करण्यात आला. फडणवीस सरकारने शिवाजी महाराजांच्या नावाने फसवी शेतकरी कर्जमाफी योजना राबवली व शिवाजी महाराजांचाही अवमान केला. महाविकास आघाडी सरकारने मात्र सत्ता येताच दिलेले आश्वासन पूर्ण करत सरसकट कर्जमाफी दिली. जनतेला दिलेला शब्द पाळला.