आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील मुख्य समस्यांकडे लोकांचे लक्ष जावू नये, यासाठी भाजपकडून वारंवार हिंदुत्वाचा वापर केला जात आहे. मात्र, वारंवार हिंदू म्हटल्याने हिंदुत्व मोठे होत नाही. यामुळे देशाचे नुकसान होत आहे. भाजपमुळे देशातील सौहार्दाचे वातावरण बिघडले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते शिर्डी येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या नवसंकल्प शिबिराच्या दुसऱ्या दिवशी बोलत होते.
देश विकायला काढला
शिबिरास सुरुवात होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेत नाना पटोलेंनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, भाजपची सध्याची कारस्थाने संविधान विरोधी आहेत. भाजपने अशा प्रकारचे राजकारण तात्काळ थांबवले पाहिजे. यापुढे काँग्रेस देशातील मुख्य समस्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती करणार आहे. तसेच, केंद्रातील भाजप सरकारने देश विकण्यास काढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून एक नवा संदेश देशात जायला हवा. यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.
मविआचे उमेदवार जिंकतील
पटोले म्हणाले, राज्यातील विरोधी पक्षात अनेक भविष्यकार आहेत. जे रोज सरकार पाडण्याची आणि झेंडा फडकाविण्याची भविष्यवाणी करतात. मी भविष्यकार नाही. मविआकडे असलेल्या मतांच्या वस्तुस्थितीला समजून मविआचे चारही उमेदवार निवडून येतील, हे निश्चित सांगतो. तसेच, राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या उमेदवाराबाबत कोणताही असंतोष नाही. पक्षात हायकमांडचा निर्णय अंतिम असतो. काही जणांनी नाराजी व्यक्त केली असली ती योग्य व्यासपीठावर दूर केली जाईल.
महिलांना समान संधी देणार
शिबिरात काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी देखील भाजपवर टीका केली. ते म्हणाले फाळणी, विध्वंस, अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस यशस्वी होऊ देणार नाही. त्यासाठीच पक्षाने देशव्यापी लढा उभारला आहे. या बैठकीतील विचारमंथनातून तयार होणाऱ्या मार्गानुसारच आगामी काळात वाटचाल करावी लागणार आहे. यापुढे पक्षात तरुण आणि महिलांनाही समान संधी देण्यात येणार आहे. गरीब, मध्यमवर्ग आणी वंचित घटकांना बरोबर घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपविरोधातील लढ्यात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.