आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाच्या वाटेवर:नव्या वर्षात महामार्गांची कनेक्टिव्हिटी

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या वर्षात नगरमधून जाणाऱ्या तीन राष्ट्रीय महामार्गांचे भूसंपादन व प्रत्यक्षातील कामाला सुरुवात होणार आहे. यासोबतच नगर शहरातील तीन बस स्थानकांना कार्पोरेट लुक येणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी याबाबत परिवहन विभागाला आराखडा करण्याच्या सूचना दिले आहेत. सर्वात महत्त्वाचे नगर शहर व तालुक्यासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय असणार आहे.

तीन बस स्थानकांना कार्पोरेट लूक नगर शहरात माळीवाडा,स्वस्तिक चौक व तारकपूर असे तीन बस स्थानके असून, नव्या वर्षात सावेडी नाका येथे आणखी एक नवे बस स्थानक सुरू होणार आहे. नगर शहरातील माळीवाडा, स्वस्तिक चौक व तारकपूर या तीन बस स्थानकांचे नूतनीकरण होणार आहे. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बसस्थानकांच्या नूतनीकरणाबाबत निर्देश दिले आहेत. शिवाय सावेडी नाका येथील सामाजिक न्याय भवनाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडावर आणखी एक नवे बस स्थानक होणार आहे त्याची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे.

बायपासवरुन सुरू होईल वाहतूक नव्या वर्षातच नगर शहराबाहेरुन जात असलेला ४० किमीचा बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे नगर शहरातून सद्यस्थितीत जाणारी ७० टक्के वाहतूक कमी होणार आहे. नगर- मनमाड रस्त्याच्या कामाची निविदा देखील जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निघणार आहे. त्यामुळे हा रस्ता नव्या वर्षात मार्गी लागण्याची शक्यता आहे.

म्युझिकल फाउंटन कार्यान्वित होणार बुरुडगाव रोडवर साईनगर उद्यानात १ कोटी रुपये खर्चून म्युझिकल फाऊंटनचा नगर शहरातील पहिलाच प्रकल्प उभारण्यात येणार आहे. आ. संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध झाला आहे. संगीताच्या तालावर व रंगबिरंगी प्रकाश होतात सुमारे २० फूट उंचापर्यंत उडणारे पाण्याचे कारंजे नगरकरांना या वर्षात पाहायला मिळणार आहे. उड्डाणपूलानंतरचा शहरातील हा आणखी एक मोठा प्रकल्प नगरकरांसाठी उपलब्ध होणार आहे.

मोधळवाडी होणार टँकरमुक्त जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागात वाडी-वस्तीपर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी नळाद्वारे उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव डेपा येथील मोधळवाडी भागात घेतलेल्या विहिरीला पाणी लागले आहे. त्यासाठी सुमारे १ कोटी १० लाख खर्च करून योजना करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२३ अखेर या योजनेतून नागरिकांना पाणी पोहोचणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. गडदे यांनी दिली.

नगरकरांना मिळणार रोज पाणी नगर शहरात महापालिकेमार्फत प्रस्तावित असलेल्या फेज टू व अमृत पाणी योजनांची कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षात नगरकरांना दररोज पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील वितरण व्यवस्थेचा समावेश असलेली फेज टू पाणी योजना कार्यान्वित केली जाणार आहे. तब्बल बारा वर्षानंतर नगरचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.

दोन एक्सप्रेसवे आणि एका ग्रीन फील्डमुळे प्रवास होणार सुखकर नव्या वर्षात नगर शहर व परिसरातून दोन एक्सप्रेस वे व एक ग्रीन फील्ड जाणार आहे. त्यापैकी सुरत -चेन्नई या नव्या ग्रीन फील्डसाठीचे ३ गावे वगळता भूसंपादन पूर्ण झाले आहे. मार्चपासून सुरत -चेन्नईच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद -नगर- पुणे हा १२५ किमीचा एक्सप्रेसवे नगर शहराजवळून जाणार आहे. त्यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांच्या नियुक्ती झाल्या असून, प्रत्यक्षात जानेवारी अखेर पासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. नगर- बीड-अक्कलकोट हा नवीन मार्ग शहापूर येथून जाणार आहे. दक्षिण भारतातून शिर्डी कडे जाणाऱ्या नगर मनमाड या रस्त्यासाठी जानेवारी महिन्यात निविदा प्रसिद्ध होणार आहे. एक हजार कोटीचा बाह्यवळण रस्ता नव्या वर्षात वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

प्रथमच कुपोषित बालकांचा आकडा १०० च्या आत येणार जिल्ह्यात ३ लाख २४ हजार ६५६ शुन्य ते सहा वयोगटातील बालकांची संख्या आहे. २०२१ मध्ये कुपोषीत बालकांची संख्या (सॅम) तब्बल ८७१ होती, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने राबवलेल्या उपाय योजनांमुळे ही संख्या २५९ पर्यंत कमी झाली. त्याच गतीने काम सुरू असल्याने, २०२३ मध्ये कुपोषीत बालकांचा आकडा १०० च्याही आत पोहोचणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील तब्बल ३ लाख १० हजार २२८ बालकांची जिल्हा परीषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फंत मागीलवर्षी तपासणी करण्यात आली होती.

त्यात तब्बल २५९ बालके कुपोषीत (सॅम) स्पष्ट झाले. ही संख्या अधिक कमी करण्यासाठी यंदाही ऑगस्टमध्ये बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात २१ बालविकास प्रकल्प कार्यालये असून ५ हजार ६३२ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाडीत ० ते ६ वयोगटातील तब्बल ३ लाख २४ हजार ६५६ बालकांची नोंद आहे. या बालकांचे नियमीत वजन व उंची मोजली जाते. उंचीच्या प्रमाणात वजन वाढले किंवा कमी झाले याचीही नोंद घेतली जात आहे. त्याचबरोबर बाळ जन्माला येणारे बाल सदृढ असावे, यासाठी गरोदर मातांचीही विशेष काळजी घेतली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...