आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेतील गुरूमाऊली मंडळाच्या रावसाहेब रोहोकले गटाची सत्ता याच मंडळातील तांबे गटाने उलथवून टाकली आहे. तांबे गटाचे चेअरनपदाचे उमेदवार किसन खेमनर यांनी रोहोकले गटाकडून उमेदवारी करत असलेल्या विद्युलता आढाव यांचा पराभव केला. तर व्हाईस चेअरमनपदी सुयोग पवार यांची बिनविरोध निवड झाली.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदाची निवडणूक जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झाली. चेअरनपदासाठी तांबे गटाकडून किसन खेमनर यांच्या उमेदवारीला राजू राहणे सुचक तर साहेबराव अनाप अनुमोदक होते. तांबे गटाबरोबरच राहिलेल्या परंतु, ऐनवेळी रोहोकले गटाकडून उमेदवारीसाठी रिंगणात उतरलेल्या विद्युलता आढाव यांच्या नावासाठी दिलीप औताडे सुचक होते तर सीमा क्षिरसागर अनुमोदक होते. या निवडणुकीत तांबे गटाचे खेमनर यांना १३ तर आढाव यांना ८ मते मिळाली. चेअरमनपदी निवड झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक आहेर यांच्यासह प्रतिस्पर्धी उमेदवार आढाव यांनीही खेमनर यांचा सत्कार केला.
मागील निवडणुकीत रोहोकले गटाने तांबे गटाला धोबीपछाड देत सत्तांतर घडवून अविनाश निंभोरे यांना चेअरमन केले होते. त्यावेळी फुटलेले सहा जण कोण ? हा प्रश्न आजही चर्चेतच निरूत्तर राहिला आहे. तसेच डावपेच रोहोकले गटाकडून होतील, त्यामुळे तांबे गटाने या निवडणुकीत सावध भूमिका घेऊन रोहोकले गटालाच धोबीपछाड देऊन, सत्ता खेचून आणली.
कोरोनामुळे बँकेची निवडणूक लांबणीवर पडली असल्याने वाढीव कार्यकाळ संचालकांना मिळाला आहे. आगामी निवडणुका जाहिर होईपर्यंत चेअरमनपदाचा कालावधी राहणार आहे.
रोहोकले गटाचे डावपेच
विद्युलता आढाव चेअरनपदासाठी इच्छूक होत्या, हा धागा पकडून रोहोकले गटाने आढाव यांना उमेदवारी देण्याचे कबुल केले. तांबे गटाने फूट टाळण्यासाठी आढाव यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. आढाव यांनी खेमनरांना आव्हान दिले. आढाव यांच्या निमित्त तांबे गटातच फूट पाडण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे.
बाह्यशक्तिंविरोधात लढा
काही बाह्यशक्तिंनी आमच्यात वितुष्ट निर्माण करण्यासाठी माझ्याविरोधात उमेदवारी करण्यास सांगितले. महिलांविषयी एवढी आस्था होती, तर त्यांनी साडेतीन वर्षे चेअरनमपद भुषवण्याऐवजी राजीनामा देऊन महिलेला का संधी दिली नाही ? मागीलवेळीही बेबनाव केला होता. या बाह्यशक्तिंविरोधात लढा सुरूच राहील.' किसन खेमनर, नूतन चेअरमन.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.