आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या सुरू:अहमदनगर जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांसाठी कोरोना चाचण्या बंद

अहमदनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांची गर्दी वाढली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने लसीकरणावर भर दिला असताना दुसरीकडे मात्र जिल्हा रुग्णालयात यापूर्वी सर्वसामान्यांसाठी होणाऱ्या कोरोना चाचण्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयाऐवजी दुसऱ्या केंद्रावर चाचण्यांसाठी जावे लागत आहे. दरम्यान, अन्य आजारांच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची जिल्हा रुग्णालयात गर्दी सोमवारी वाढल्याचे दिसून आले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना लाळेचे नमुने घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत होते. त्याचा अहवाल देण्यासाठी बराच कालावधी लागत होता. दुसऱ्या लाटेत जिल्हा रुग्णालयात अद्ययावत प्रयोगशाळा सुरू करून नमुन्यांची चाचणी घेऊन अहवाल दिले जात होते. त्यामुळे अहवाल तातडीने येऊ लागले. जिल्हा रुग्णालयात दुसऱ्या लाटेतमोठ्या संख्येने चाचण्या करण्यात आल्या.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात केवळ शासकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. सर्वसामान्यांसाठी शासकीय रुग्णालयातील आरटीपीसीआर चाचण्या बंद केल्या आहेत. त्यामुळे नगर शहरासह ग्रामीण भागातून चाचण्यासाठी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागत आहे.

साथीचे आजार वाढले
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्हा रुग्णालय केवळ कोविडसाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे अन्य उपचार व शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या. तब्बल दीड वर्ष अन्य उपचारासाठी शासकीय रुग्णालय बंद होते. गेल्या काही महिन्यापूर्वीच अन्य उपचार सुरू झाले आहेत. गेल्या काही दिवसापासून साथीच्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी तपासणीसाठी मोठी गर्दी जिल्हा रुग्णालयात दिसून आली.

बातम्या आणखी आहेत...